गेल्या वर्षी मनसे आणि पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवर लावण्यात येणारे लाऊडस्पीकर आणि त्यावर चालणारी अजान याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मशिदींवरील लाऊडस्पीकर बंद होत नाहीत, तोपर्यंत आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही राज ठाकरेंनी दिला होता. त्याविरोधात प्रतिकात्मक आंदोलन म्हणून मंदिरांवर भोंगे लावून त्यावर हनुमान चालीसा वाजवण्याचंही आव्हान राज ठाकरेंनी दिलं होतं. आता या मुद्द्यावरून आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राज ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तसेच, त्यांचा उल्लेख राज भैय्या असा करत त्यांना पाठिंबा देण्याचंही विधान केलं आहे.

काय होतं लाऊडस्पीकरचं आंदोलन?

गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये मनसेकडून मशिदींवर लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरविरोधात आक्रमक आंदोलन करण्यात आलं. यादरम्यान राज ठाकरेंनी घेतलेल्या अनेक सभांमधून लाऊड स्पीकर काढण्यासंदर्भात सरकारला अल्टिमेटमही देण्यात आले. ४ मे नंतर प्रतिकात्मक आंदोलन म्हणून मनसेकडून मशिदींसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा देखील लावण्यात आली. भोंगे उतरत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याची ठाम भूमिका राज ठाकरेंनी तेव्हा घेतली होती. नंतर काही ठिकाणचे लाऊडस्पीकर उतरल्यामुळे किंवा बंद राहिल्यामुळे मनसेच्या आंदोलनाला यश आल्याचं चित्र निर्माण झालं.

मध्यंतरीच्या काळात शिवसेनेतली बंडखोरी, एकनाथ शिंदेंची फडणवीसांसोबत हातमिळवणी आणि राज्यातील सत्ताबदल यामुळे मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यामुळे अजान आणि लाऊडस्पीकरचा मुद्दा काहीसा मागे पडल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी माध्यमांशी बोलताना राज ठाकरेंना खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

नागपूर: ‘हिंदू संघटनांनी मोर्चे काढण्यापेक्षा …’ प्रवीण तोगडिया म्हणाले, ५० वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिराला धोका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजानविषयी किंवा लाऊडस्पीकरविषयी आता तुमची भूमिका काय आहे? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर प्रवीण तोगडियांनी राज ठाकरेंचा उल्लेख केला. “तुम्ही राज ठाकरेंना हा प्रश्न विचारा. त्यांच्या मित्रांचं सरकार आलं आहे. आता तुम्ही कधी आंदोलन करून अजान बंद करणार आहात? उद्धव ठाकरेंच्या सरकारच्या काळात आमचे राजभैय्या मैदानात आले होते. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्रभाऊंच्या राज्यातही राज ठाकरेंनी मैदानात यावं. आम्ही त्यांना साथ देऊ”, असं प्रवीण तोगडिया म्हणाले आहेत.