Video Of Farmers Daughter Buldhana: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात गेल्या आठवड्यात गणेश श्रीराम थुट्टे (५५) आणि रंजना थुट्टे (४७) या शेतकरी दांपत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या पीडित कुटुंबाला राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी काल भेट देऊन सांत्वन केले. सततची नापिकी, हुमणी अळीने सोयाबीनचे हातून गेलेले पीक आणि त्यामुळं डोक्यावर असलेल्या २ लाखांहून अधिक कर्जाचा डोंगर कसा उतरायचा, या चिंतेने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्या या सांत्वनपर भेटीदरम्यान काही विद्यार्थिनींनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी रोहित पवारांसमोर त्यांच्या व्यथा मांडल्या. यातील आठवीत शिकणाऱ्या सीमा थुट्टे या विद्यार्थिनीने रोहित पवार यांच्यासमोरच, “शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का?”, असा सवाल केला. याचबरोबर तिने शेतकरी असलेल्या वडिलांकडे वही घ्यायला १० रुपयेही नसतात, असे म्हटले आहे.
रोहित पवार यांच्यासमोर व्यथा मांडताना ही विद्यार्थिनी म्हणाली की, “दादा, एक प्रश्न होता… शेतकऱ्यांचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का? शेतकऱ्यांच्या घरात मीठ असतेय तर तेल नसतेय आणि तेल असतेय तर मीठ नसतेय. तेलाला भाव ११५ रु. लिटर आणि सोयाबीनला ३-४ हजार रुपये क्विंटल? शेतकऱ्याला हे कसे पुरणार? वही घ्यायचं म्हटलं, तर पप्पांच्या खिशात १० रुपयेही नसतात. याचं खूप वाईट वाटतं.”
या मुलीने मांडलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले की, “तुम्ही शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या मुली आहात. तुम्ही वारकरी संप्रदायाच्या असल्यामुळे तुमच्यावर चांगल्या विचारांचा पगडा आहे. तू जे मांडत आहेस ते खरे आहे. तुला माहिती आहे का, भारतात सर्वात जास्त कापूस आणि सोयाबीन उत्पादन होते. यातून तुमच्या घरात पैसे यायला लागतात. कापसाला जेव्हा १० हजार रुपये भाव मिळू लागतो तेव्हा हे सरकार आयात करायला सुरुवात करते. यामुळे भाव खाली पडतात आणि आपला शेतकरी झोपतो.”
रोहित पवार यांनी थुट्टे शेतकरी दांपत्याच्या आत्महत्येनंतर एक्सवर एक पोस्टही केली होती. त्यामध्ये म्हटले होते की, “थुट्टे दांपत्याच्या आत्महत्येमुळे एक घर उद्ध्वस्त झाले, पण सरकारच्या डोक्यात मात्र अजूनही उजेड पडलेला नाही. सरकारने कर्जमाफी दिली असती, तर आज थुट्टे दांपत्य आपल्यात असते. या कुटुंबाला भेटलो, तेव्हा कोणत्या शब्दांनी त्यांचे सांत्वन करावे हेच कळत नव्हते. सरकार केवळ निवडणुकीत आश्वासन देते आणि स्वार्थ साधला की ते पद्धतशीर विसरते. अजूनही दिलेल्या शब्दाप्रमाणे कर्जमाफी केली नाही, तर भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखता येणार नाहीत.”