चंद्रपुरामधील भद्रावती तालुक्यात नदीपात्रात पट्टेदार वाघ अडकला आहे. भद्रावती-माजरी मार्गात नदीवर असणाऱ्या पुलाखाली हा वाघ अडकला आहे. वाघाला हटवण्यासाठी वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चारगाव गावाजवळील नागोराव पाटील यांच्या शेताशेजारच्या नदीपात्रामध्ये वाघ अडकला आहे. या वाघाला वाचवण्यासाठी वनअधिकाऱ्यांनी घटनास्थी धाव घेतली आहे. या वाघाचे तोंड दोन दगडाच्या फटीमध्ये अडकले आहे. मागील अनेक तासांपासून अडकून पडलेल्या या वाघाचा श्वास सुरू आहे. मात्र त्याला झालेली जखम पाहता तो वाचण्याची शक्यता कमी असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वाती म्हैसेकर यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गेल्या आठवडाभरापासून या परिसरातील चारगाव,कुनाडा, देऊरवाडा परिसरात वाघाने दहशत निर्माण केली आहे. दोन दिवसापूर्वी चारगाव येथील बैलावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती. हा पट्टेदार वाघ नर असून तो वयात आल्याने तो मादीच्या शोधात भटकत असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांनी दिली आहे.

आज पहाटे या मार्गाने जाणाऱ्या वेकोली कर्मचाऱ्यांना या पात्रात वाघ दिसताच त्यांनी याबाबतची माहिती परिसरात दिली. वाघ अडकल्याची बातमी गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली आणि पुलावर बघ्यांची एकच गर्दी झाली आहे.