Clash at Vidhan Bhavan : राज्याच्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळालं. मात्र, यातच विधानभवन परिसरात गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला.

या प्रकरणी गोपीचंद पडळकर यांचे समर्थक आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकाला पोलिसांनी अटक केलं होतं. या अटकेनंतर दोन्ही कार्यकर्त्यांना किल्ला न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख या दोघांनाही तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा पोलिसांनी न्यायालयात मोठा युक्तीवाद केल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, विधानभवन लॉबीतील मारहाण प्रकरण हा पूर्व नियोजित कट होता का? हा कट कुठे रचला? या संदर्भातील तपास करायचा आहे. त्यामुळे या घटनेतील दोन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली. मात्र, न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले यांच्या विरोधात ६ गुन्हे दाखल आहेत, तसेच नितीन देशमुख यांच्याविरोधात ८ गुन्हे दाखल असून दोन्हीही आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

तसेच ऋषिकेश ऊर्फ सर्जेराव टकले आणि नितीन देशमुख हे विनापरवाना विधानभवनात घुसले का? किंवा त्यांना त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यासाठी कोणी मदत केली का? याबाबतचे सीसीटीव्ही देखील तपासायचे आहेत आणि अजून आरोपींचा देखील शोध घ्यायचा आहे असं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं.

राहुल नार्वेकरांची मोठी कारवाई

विधान भवनाच्या आवारातील हाणामारीच्या घटनेनंतर आज सभागृहात पडसाद उमटले. याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांकडून कारवाईची अपेक्षा होती. त्यानुसार अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मोठी कारवाई केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले अभ्यागत नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेले अभ्यागत सर्जेराव टकले या दोघांचे वर्तन सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलीन करणारे होते. त्यांच्याविरोधात चौकशी करून विशेषाधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द करत आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा अध्यक्षांची सर्व सदस्यांना तंबी

नार्वेकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड व गोपीचंद पडळकर या विधानसभा सदस्यांनी देशमुख व टकले या दोन अभ्यागतांना विधान भवनात आणले. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा सदस्यांनी सभागृहात याप्रकरणी खेद व्यक्त करावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची हमी द्यावी. त्याचबरोबर सभागृहाची प्रतिमा व प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल याची काळजी घ्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही घडणार नाही अशी अपेक्षा मी सर्व सदस्यांकडून बाळगतो.”