Vijay Rupani on Maharashtra Government Formation and New Chief Minister : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं आहे. मात्र, महायुतीने अद्याप सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. त्याचबरोबर त्यांच्या सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार हे देखील ठरलेलं नाही. सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचं सांगितलं जात असलं तर त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही. अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नव्हते. तर, एकनाथ शिंदे यांनी माघार घेत भाजपा पक्षश्रेष्ठी ज्या नेत्याचं नाव जाहीर करतील मी त्याला पाठिंबा देईन असं स्पष्ट केलं आहे. दुसऱ्या बाजुला महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून भाजपा विधीमंडळ पक्षाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत विधीमंडळ नेत्याच्या निवडीची औपचारिकता पार पडेल. या बैठकीसाठी, विधीमंडळ नेत्याची निवड करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर विजय रुपाणी मंगळवारीच मुंबईत दाखल झाले आहेत.

मुंबईत दाखल झाल्यावर विजय रुपाणी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी त्यांनी भाजपाच्या पुढील कार्यवाहीची माहिती दिली. रुपाणी म्हणाले, “महायुतीचं सरकार तर बनणार आहे. बुधवारी आमची विधीमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्या बैठकीत आम्ही चर्चा करू. या बैठकीत आम्ही विधीमंडळ नेत्याची निवड करू. उद्या (५ डिसेंबर) शपथविधी होणार आहे. निश्चित वेळेवर शपथविधी पूर्ण होईल. राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार ते देखील विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतच ठरेल”. यावेळी रुपाणी यांना विचारण्यात आलं की या बैठकीत तुम्ही काय चर्चा करणार आहात? त्यावर रुपाणी म्हणाले, “आमची भाजपाची एक ठरलेली कार्यपद्धती आहे. आम्ही लोकशाही परंपरेने काम करणारे लोक आहोत. लोकशाही पद्धतीनेच आम्ही आमचा नेता निवडू”.

हे ही वाचा >> कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचं नाव खरंच निश्चित झालंय का?

विजय रुपाणी म्हणाले, “विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत आम्ही आमच्या सर्व आमदारांशी बोलू. प्रत्येकाचं मत विचारात घेऊ. या बैठकीत जे नाव किंवा प्रस्ताव आमच्यासमोर येईल त्यावर चर्चा करू. विधीमंडळ नेत्याची बिनविरोध निवड झाल्यानंतर उद्या शपथविधी होईल. सर्वसंमतीने ही निवड केली जाईल. जर दुसऱ्या एखाद्या आमदाराला विधीमंडळ नेता व्हायचं असेल तर त्यावरही चर्चा होईल”. यावेळी रुपाणी यांना विचारण्यात आलं की मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांचं नाव निश्चित झालं आहे का? मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा कधी होईल. यावर रुपाणी म्हणाले, “अद्याप कोणाचंही नाव निश्चित झालेलं नाही. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत नाव निश्चित केलं जाईल”.