विजय शिवतारे यांचे प्रतिपादन

वेद आणि मंत्रघोषात विधीवत पूजाविधीने किल्ले रायगडावर बुधवारी जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या िहदू तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. तारीख आणि तिथीनुसार यावर्षी एक दिवसाचा फरकानेच दोन्ही संस्थांचे कार्यक्रम आले होते. बुधवारी तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन साजरा झाल्यानंतर दुसरयाच दिवशी तिथीनुसार श्रीशिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती कडून शिवराज्याभिषेक दिनोत्सव साजरा करण्यात आला. या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांची उपस्थित होते.

तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिनोत्सवाला देखील संपूर्ण राज्यातून शिवभक्तांनी मोठी हजेरी लावली होती. यावेळी पारंपारीक वेशभूषेत अनेक शिवभक्त गडावर हजर होते. होळीचा माळ आणि नगारखाना या परीसरात ढोल ताशांचा गजर आणि मर्दानी खेळ सादर करणारे उत्साही तरूण दिसून येत होते. भगव्या पताका जिकडे तिकडे फडकताना दिसत होत्या. सहा तारखेला सायंकाळी गडदेवता शिरकाई मातेचे आणि श्रीजगदीश्वराची पूजा करण्यात आली तर शिवरायांच्या प्रतिमेचे तुलादान करण्यात आले. रात्री शाहिरी, तसेच जागरणाचे कार्यक्रम आयोजीत केले होते. धर्मशाळा ते राजदरबार अशी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणुक काढून महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. गडावर विवीध धार्मिक विधी, पुजापाठ, वेद मंत्रघोषाने रायगडावर मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. या मंगलमय वातावरणात शिवरायांच्या प्रतिमेचे विधिवत पुजन सपत्नीक रोहित पवार याच्या हस्ते करून नंतर छ.शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधुंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. यावेळी शंखनाद झाला आणि अवघे वातावरण मंत्रमुग्ध झाले. पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी छ.शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्यासह महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, आमदार रूपेश म्हात्रे, आमदार अमित घोडा, जिल्हा परीषदेचे विरोधी पक्ष नेते, जिल्हा परीषदेच्या सदस्या मिताली खेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळ राउळ, चंद्रकांत कळंबे, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी विजय शिवतारे यांनी आपल्या भाषणात चंद्र सुर्याशी संलग्न िहदू कालदर्शीकेला आपण मानणारे असल्या कारणाने तिथीनुसारच शिवरायांची जयंती देखील साजरी झाली पाहिजे असे मत व्यक्त करत देश आणि जनतेसाठी ज्या छ.शिवरायांनी मोठा त्याग केला आहे त्यांच्या प्रति आदर राखत प्रत्येकाने रायगडावर आले पाहिजे असे सांगीतले. ना.विजय शिवतारे हे तारखेप्रमाणे झालेल्या कार्यक्रमाला देखील उपस्थित होते या तारीख आणि तिथीचा फरक स्पष्ट करताना त्यांनी तारखेनुसार शिवराज्याभिषेकाला जोश होता मात्र तिथीनुसार होत असलेल्या शिवराज्याभिषेकात मंत्रघोष असल्याचे सांगीतले. आपल्या प्रास्ताविकेत आमदार भरतशेठ गोगावले यांनी गर्दीची तुलना आम्ही करत नाही मात्र जे निष्ठावान आहेत ते या सोहळ्याला आले आहेत असे सांगीतले. देवधर्माचे रक्षण छ.शिवरायांनी केले यामुळे प्रतिवषी तुम्ही महालक्ष्मी, शिर्डी, सिद्धीविनायक, या देवालयात जा मात्र एकदातरी रायगडावर या असे आवाहन केले.

या कार्यक्रमादरम्यान महाराजांच्या आरमारातील सरदारांच्या वशंजाच्या जवळ असलेल्या शस्त्रांची पूजा देखील यावेळी करण्यात आली. यावेळी मालुसरे, कान्होजजी जेधे, कंक, राजे महाडीक आदी घराण्यांचे वंशज उपस्थित होते. शिवाजी पार्क ते रायगड हे अंतर धावत आलेल्या भूषण होडगे याचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. तर मी मावळा शिवबाचा याध्वेनीफितीचे प्रकाशन देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.