सांगली : महायुती सरकारकडून दोन्ही समाजांना खेळवण्याचे काम पद्धतशीरपणे केले आहे. जो अध्यादेश काढला त्याचा काही अर्थच लागत नाही आणि ओबीसींना काय दिले हेच समजत नाही, अशी टीका विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी केले.
सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी (ता. कडेगाव) येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या लोकतीर्थ स्मारकाच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार डॉ. विश्वजित कदम, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, मोहनराव कदम, इंद्रजित मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
वडेट्टीवार म्हणाले, की मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढला आणि कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया सुरू करत असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे ओबीसींनाही आश्वासित करण्यात आले. एकाने मारल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने रडल्यासारखे करायचे. एकाने हसल्यासारखे करायचे आणि दुसऱ्याने अश्रू पुसल्यासारखे करायचे. अशा पद्धतीचे पूर्वरचित काम सध्या राज्यात सुरू आहे. भविष्यात सगळ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचे दिसून येईल. राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशाचा अर्थच कळत नाही.
चोरीचे काम आणि चुकीचे काम कोणी केले असेल, तर त्याच्यावर कारवाई करणे पोलीस अधिकाऱ्यांचे काम आहे. सत्ता सेवेसाठी आहे. सत्ता दुसऱ्यांवर दादागिरी करण्यासाठी नाही. त्या अधिकाऱ्यावर दादागिरी करणे हे लोकशाहीला शोभत नाही. मन वाटेल तसे आम्ही काम करू अशी भूमिका यांची दिसते. करमाळ्यातील महिला पोलीस अधिकाऱ्याला केलेल्या दमदाटीवरून वडेट्टीवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. प्रत्येकाला सत्तेचा माज आला आहे. यांच्यामध्ये तो ओसंडून वाहत असल्याचे दिसून येते. सत्ता सेवेसाठी होती, पण आता महायुतीच्या सरकारला सत्ता मालकी हक्काने मिळाल्यासारखे वाटते, असेही ते या वेळी म्हणाले.
या वेळी आमदार डॉ. कदम म्हणाले, ‘काँग्रेस पक्षासाठी आज संघर्षाचा काळ आहे आणि आपण विरोधी पक्षाच्या बाकावर आज बसलो आहोत. काँग्रेसचे आज केवळ १६ आमदार आहेत. पण, जरी आम्ही १६ आमदार असलो, तरी पुढच्या ५ वर्षात जर हे सत्तेतील सरकार महाराष्ट्राच्या जनतेबाबत चुकीचे वागले तर या सरकारचा घाम काढायची ताकद अजूनही आमच्यामध्ये आहे. मी पतंगराव कदम यांचा मुलगा आहे, बंटी पाटील आमचा वाघ आहे, विजय वडेटीवर विदर्भाचे वाघ आहेत आणि खासदार विशाल पाटील दिल्लीत काँग्रेस पक्षाचे विचारावर लढत आहेत असेही ते म्हणाले. या वेळी खासदार पाटील, आमदार सतेज पाटील यांचेही भाषण झाले. जितेश कदम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.