Vijay Wadettiwar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन खरेदी व्यवहार प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटींची जमीन ३०० कोटींना खरेदी आणि केवळ ५०० रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात तीन जणांवर गुन्हा दाखल झाला. पण पार्थ पवार यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, यावरून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आणखी गंभीर आरोप केले आहेत. ‘पार्थ पवारांना सरकारकडून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे’, असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे पार्टनर आहेत. मात्र, असं असताना जे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यामध्ये दिग्विजय पाटील, एक सबरजिस्टार आणि शीतल तेजवानी यांच्यावर झाले आहेत. यातील मूळ व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणात पार्थ पवारांना सरकारचा आर्शीवाद असून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आमचा आरोप आहे”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

“अजित पवार म्हणतात की माझा काहीही संबंध नाही, मग पुण्याचं पालकमंत्री कोण आहे? अजित पवारच आहेत. २१ कोटींची स्टॅम्प ड्युटी चोरी केली जाते. दुसरीकडे उद्योग संचालनालय २४ तासांत यासाठी परवानगी देतं? ज्या जमीनीचं टायटल क्लिअर नाही, अद्यापही त्या जमीनीच्या टायटलवर सरकार अशी नोंद आहे. ती जमीन महार वतनाची जमीन आहे. ते लोक गेले २५ वर्ष लढा लढत आहेत. असं असताना १८०० कोटींचा व्यवहार होतो आणि तरीही अजित पवारांना खरंच माहिती नसेल का? हे महायुतीचं सरकार म्हणजे तू ही खा आणि मी ही खातो असा कारभार सुरू आहे”, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

“या प्रकरणात पार्थ पवारांवर गुन्हा दाखल होण्याची अपेक्षा होती. पण आता तरी सरकारने ती जमीन मूळ मालकाच्या नावावर करावी. या प्रकरणात संबंधित कंपनीच्या सर्व भागीदारांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. एवढा मोठा पैसा कुठून आला? एवढा मोठा व्यवहार नेमकं कसा झाला? याचा शोध सरकारने घ्यावा. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून चौकशी करण्यात यावी”, असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

“कुटुंबातील व्यक्ती आहे आणि तुम्ही जर दुसऱ्याकडे बोट दाखवत असाल तर स्वत:कडेही काही बोट येतात. त्यामुळे अशा प्रकारचं धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतील का? हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. या जनीन व्यवहार प्रकरणातील सर्वांचीच नार्को टेस्ट करायला पाहिजे. एवढा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे, अन्यथा हा घोटाळा समोर आला नसता तर काय झालं असतं?”, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं.

“अजित पवारांना या व्यवहाराची आधीच कल्पना आली होती, तर त्याच वेळेस हा व्यवहार रोखला असता तर बरं झालं असतं. घरात एवढा मोठा व्यवहार होतो आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला माहिती होत नाही? असं होऊ शकत नाही. त्यामुळे त्या वेळेस हा व्यवहार रोखला असता तर अजित पवारांवर आज ही वेळ आली नसती. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झाला नाही, याचा अर्थ सरकारकडून पार्थ पवारांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे”, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.