राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी रविवारी (१० सप्टेंबर) कोल्हापूर येथे आयोजित सभेत बोलताना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली. यावेळी अजित पवार म्हणाले, मी आज महाराष्ट्राला एक गोष्ट सांगतो. उद्धव ठाकरे यांचं सरकार (महाविकास आघाडी) ज्या दिवशी पडत होतं, त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच्या सर्व आमदारांनी आणि मंत्र्यांनी एक पत्र तयार केलं आणि ते पत्र नेत्यांना दिलं. या पत्रात म्हटलं होतं की महायुतीत सामील व्हा. हे खोटं असेल तर मी राजकारणातून निवृत्त होईन. कुणाची तयारी आहे का? आणि हे खरे असेल तर मग जे लोक खोटं बोलत आहेत त्यांनी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे. आहे का त्यांची तयारी? आम्ही केवळ जनतेच्या कामांच्या दबावापोटी सत्तेत सहभागी झालो आहोत.

अजित पवारांच्या या वक्तव्यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विजय वडेट्टीवार म्हणाले, कोणी काहीही म्हणू देत, कितीही इमानदारीची भाषा करू देत. आमच्याकडेही पुरावे आहेत. कोण कशासाठी गेलाय? कोण सत्तेसाठी गेलाय? कोण सेवेसाठी गेलाय? कोण विकासासाठी गेलाय आणि कोण संस्थांच्या (ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स) दबावात गेलाय? आमच्याकडे याचे सगळे पुरावे आहेत. योग्य वेळी, आवश्यकता असेल तेव्हा सगळ्या गोष्टी, कोर्टाच्या आदेशापासून सगळं उघड करू. त्यामुळे विरोधकांना तुम्ही जी धमकी देताय, इशारे देताय, ते सहन करण्यासाठी, ऐकून घेण्यासाठी आम्ही नाही.

विजय वडेट्टीवार अजित पवारांना उद्देशून म्हणाले, तुम्ही ज्या पद्धतीने पक्ष सोडून तिकडे गेलात, ते कशासाठी गेलात हे जनतेला माहिती आहे. तुम्ही किती पापं लपवली तरी कशामुळे गेलात हे जनतेपासून लपून राहिलेलं नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवार काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले, अनेक जण आमची बदनामी करतात. आम्ही महायुतीत सामील झालो म्हणून टीका करतात. आमच्यावर दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सामील झालो असा दावा करतात. आमच्यावर लोकांची कामं करण्याचा दबाव होता म्हणून आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. संधी मिळाल्यावर लोकांची कामं केली पाहिजेत.