पंढरपूर : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे पडघम राज्यात वाजू लागले आहेत. यात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील अनगर येथील नगरपंचायतची पहिलीच निवडणूक होत आहे. येथे भाजपाचे सर्व उमेदवार बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहेत. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपाच्या विरोधातील उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद झाला. या नंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी माजी आमदार राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे उर्फ विक्रांत पाटील यांनी जल्लोष करताना सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाद करू नका अजित पवार असे थेट आव्हान दिले. याची समाज माध्यमावर चर्चा झाली. यानंतर माजी आमदार राजन पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली. या मुळे अनगर आणि राजकारण चर्चेत आले.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यावर पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आणि सध्या भाजपा मध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व आहे. मोहोळ मतदारसंघात पाटील सांगतील तो उमेदवार निवडणून येणार असे चित्र होते. याच मोहळ तालुक्यातील अनगर गावचे हे माजी आमदार राजन पाटील. येथील ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध होत होती. पाटलांची दहशत,वर्चस्व आणि विरोधक नसल्याने ग्रामपंचायत निवडणूक कि अन्य निवडणुकीत पाटील बोले गाव डोले या प्रमाणे एकतर्फी निर्णय होत होते. हे अनगर आता नगर पंचायत झाले. या ठिकाणी देखील सर्व निवडणुका बिनविरोध होणार अशी चर्चा होती. या निवडणुकीत सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी फक्त भाजपाचे तिकीट आणि कमळ चिन्हावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला.
त्या प्रमाणे अनगर येथे भाजपाचे १७ उमेदवारानी अर्ज दाखल केला. मात्र त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने हे सर्व बिनविरोध होणार हे निश्चित आहे. याची औपचारिक घोषणा बाकी आहे. तर नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. या ठिकाणी माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता अजिंक्यराणा पाटील यांनी भाजपा तर्फे अर्ज दाखल केला. त्याला विरोध म्हणून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उज्वला थिटे यांनी अर्ज दाखल केला. थिटे यांना अर्ज दाखल करताना पाटील समर्थकांनी दहशत केल्याचा आरोप त्यांनी केला.
तर पोलीस संरक्षणात थिटे यांनी शेवटच्या दिवशी अर्ज दाखल केला. तसेच अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांनी देखील अर्ज दाखल केला. अर्जाच्या छाननी दिवशी शिंदे यांनी थिटे यांच्या अर्जावर हरकत घेतली. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांनी छाननी करताना थिटे यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्जात सूचकाची सह नाही असे दिसून आल्याने उज्वला थिटे यांचा अर्ज बाद केला. अपक्ष उमेदवार शिंदे अर्ज माघारी घेणार आहेत.
त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांनी मंगळवारी सायंकाळी जल्लोष केला. यामध्ये राजन पाटील यांचा मुलगा बाळराजे उर्फ विक्रांत पाटील यांनी सगळ्यांचा नाद करा पण अनगरकरांचा नाद करू नका अजित पवार असा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला.आणि याची चर्चा, टीका आज दिवसभर झाली.या नंतर बुधवारी माजी आमदार राजन पाटील यांनी माफी मागितली. मोठे पवार आणि अजित पवार यांच्या मुळे आमची प्रगती झाली आहे. माझ्या मुलाचे समर्थन करत नाही. तो लहान आहे. असे माजी आमदार राजन पाटील यांनी झाल्या प्रकरणावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र या घटनेमुळे अनगर आणि राजन पाटील चर्चेत आले
