संकटात जो यशस्वी होतो तो खरा प्रशासक. विलासराव देशमुखांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत अनेक संकटांवर मात करत प्रशासनावर आपली मजबूत पकड असल्याचे सिद्ध केले. त्यांची स्मृती राज्याला सतत प्रेरणादायी ठरेल, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी काढले.
लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळय़ाच्या अनावरण समारंभप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर होते. कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, राज्य ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, वैशालीताई देशमुख, आमदार दिलीपराव देशमुख, अमित देशमुख, खासदार सुनील गायकवाड, आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, विलासरावांचे व आपले अतिशय जुने संबंध होते. आम्ही अनेक वष्रे एकत्र काम केले. आमच्यात मतभेद होते. संघर्षांचे प्रसंग आले मात्र व्यक्तिगत सलोखा आम्ही जपला. १९७२ मध्ये तत्कालीन उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तिकीट वाटपात तडजोड करण्याची बठक होती. शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव पाटील निलंगेकर व विलासराव देशमुख हे तिघे या बठकीस उपस्थित होते. रात्री ७ पासून सकाळी ६ पर्यंत ही बठक चालली. या बठकीतून मतभेद मिटवता आले नाहीत. आपल्या आयुष्यातील लक्षात राहणारी ही बठक होती. मात्र बठकीनंतर सर्वानी तुम्ही घ्याल तो निर्णय आम्ही मान्य करू असे सांगितले व बठकीनंतर झालेला निर्णय सर्वानी मानला. ते पहिल्यांदा मंत्री झाले तेव्हा आपण विरोधी पक्षनेते होतो. पहिल्याच मंत्रिपदाच्या कारकीर्दीत विलासरावांचे द्रष्टेपण लक्षात आले. विलासराव व गोपीनाथराव मुंडे यांच्यातील मत्री हे आदर्श मत्रीचे उदाहरण ठरले. विलासराव अनेकांच्या टोप्या उडवायचे, मात्र त्यांच्याबद्दलचा आदर कमी होणार नाही याचे भान ठेवायचे. १९९३ च्या भूकंपाच्या वेळी त्यांनी ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली तेव्हाच ते अतिशय उत्तम प्रशासक असल्याचे आपल्याला अनुभवास आले. गडचिरोली जिल्हय़ातील एका आदिवासी कुटुंबातील मुलासाठी नियम डावलून त्यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला होता. कॅगच्या अहवालात त्याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली, तेव्हा आपण ती फाइल मागवून घेतली. त्यावर विलासरावांनी लिहिले होते, नियम डावलून मी आदिवासी कुटुंबीयाच्या मुलास मदत करण्याचा निर्णय घेतो आहे. कायदेशीर अडचण येत असेल तर त्यासंबंधी प अन् प मी भरण्यास तयार आहे, असे त्यांनी फाइलवर लिहून ठेवले होते. त्यातूनच त्यांची सामान्य माणसाला मदत करण्याची दृष्टी लक्षात येते. विलासरावांचा पुतळा हा सर्वानाच कायम प्रेरणा देणारा ठरेल, असे ते म्हणाले.
प्रारंभी प्रतिभा पाटील कव्हेकर यांनी प्रास्ताविक केले. आमदार अमित देशमुख, खासदार सुनील गायकवाड, विलासरावांचे मित्र उल्हास पवार, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची समयोचित भाषणे झाली. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी विलासराव व गोपीनाथराव मुंडे यांच्या मत्रीच्या आठवणी जागवल्या. दोघे ते आज असते तर एकमेकांबद्दल काय बोलले असते याची झलकही त्यांनी दाखवली. अशोक चव्हाण यांनी विलासराव व गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाडय़ाच्या प्रश्नासाठी महत्त्वाची भूमिका वठवली होती. तेच काम पंकजा मुंडे व अमित देशमुख यांनी पुढे न्यावे असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात शिवराज पाटील चाकूरकर यांनी विलासराव अंगच्या गुणामुळेच देशाचे नेते बनले. दुसऱ्याच्या मदतीमुळे माणूस कधीच मोठा होत नाही. ते निधडय़ा छातीचे लढवय्ये पण समन्वयवादी नेते होते असे सांगत भविष्याची चिंता करू नका. पुढची पिढी आपल्यापेक्षा दोन पावले पुढे  टाकणारी आहे. सर्वानी त्यांना साथ देण्याची गरज असल्याचे सांगितले.
दिलीपकुमार अन् दीपिका
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे राजकारणातील स्थान म्हणजे चित्रपटसृष्टीतील दिलीपकुमारांचे जे स्थान आहे ते असल्याचा उल्लेख पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात केला. हजरजबाबी शरद पवारांनी आपले चित्रपटक्षेत्रातील ज्ञान कमी असल्यामुळे रितेश देशमुख यांच्याकडून आपण माहिती घेतली व सध्याच्या चित्रपटक्षेत्रातील दीपिका पदुकोणचे जे स्थान आहे ते पंकजा मुंडे यांचे असल्याची टिप्पणी करून कार्यक्रमात हशा पिकवला.