कराड : वन्यप्राण्यांच्या साखळीत बिबट्याचे स्थान महत्त्वाचे आहे. मानव आणि बिबट्या संघर्ष टाळून त्याच्या जीवनाबद्दल जागृती निर्माण व्हावी, यासाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण परिक्षेत्रातील ढेबेवाडी विभागात खळे, शिद्रुकवाडी, धामणी, काळगाव, चव्हाणवाडी, रामिष्टेवाडी या ठिकाणी जनजागृती करण्यात आली. त्याला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
बिबट्याची जीवनशैली, बिबट्याचे अन्नसाखळीतील महत्व, मानव- बिबट्या संघर्षाची कारणे, संघर्षाचे परिणाम, संघर्ष टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना, बिबट्याच्या वावर क्षेत्रात घ्यावयाची खबरदारी याची गावागावातील ग्रामस्थांना या वेळी सखोल माहिती वनक्षेत्रपाल पाटण राजेश नलवडे यांनी दिली.
काळजी म्हणून शेतात जाताना सोबतीला कोणालातरी घेऊन जावे, हातात एक घुंगरू लावलेली काठी असावी, आपल्याकडे असणाऱ्या भ्रमणध्वनीवर संगीत लावावे, जेणेकरून आपली जाणीव वन्यप्राण्यांना जाणवून देणे, अधूनमधून कोणाचे तरी नाव घेऊन आरोळी देणे, वाकून किंवा बसून काम करताना आजूबाजूला लक्ष ठेवणे अशा सूचना ग्रामस्थांना करण्यात आल्या, त्याच बरोबर बिबट्याचे मुख्य खाद्य त्याच्या नजरेच्या पटीत म्हणजे शेळी, मेंढी, वासरू, कालवड, नवजात शिशु, कुत्री, माकड, कोंबडी आदी आहे. त्यामुळे आपल्या लहान मुलांवर लक्ष असणे गरजेचे आहे.
लहान मुले त्यांचे भक्ष्य नाही. पण, लहान मुले बसून, वाकून खेळतात तेव्हा बिबट्याला कोणी चार पायाचा प्राणी आहे, असे वाटून तो हल्ला करू शकतो. त्यामुळे याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन मार्गदर्शक वनाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.
तसेच जर मनुष्य त्याचे खाद्य असते, तर तो गाव वस्तीत येऊन घरातून माणसांना पकडून घेऊन गेला असता. परंतु, मनुष्य पाहिला की, तो पळून जातो. म्हणजे तो मनुष्य प्राण्याला घाबरतो ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपल्या गावांत कुठे एखाद्या ठिकाणी बिबट्या बसलेला दिसला किंवा अडकलेला दिसला तर त्या ठिकाणी न जाता गोंधळ न घालता लगेच वन विभागास कळवावे, असे आवाहन या वेळी वनाधिकाऱ्यांनी केले. वनरक्षक अमृत पन्हाळे, वनरक्षक शशिकांत नागरगोजे यांनी ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन केले. या वेळी गावातून भिंती पत्रके माहिती फलक लावून जगून जागृती करण्यात आली. या वेळी वनरक्षक प्रशांत लवटे, वनरक्षक शरद टाले, वनरक्षक सतीश वीर व इतर वनाधिकारी, वन कर्मचारी उपस्थित होते.