सातारा : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी चळवळ उभी करून गावचा विकास करण्याचा संकल्प गावकऱ्यांनी ठेवला पाहिजे. ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. देश मजबूत करायचा असेल, तर गावे समृद्ध झाली पाहिजेत, असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.

सातारा येथे पंचायत राज अभियान कार्यशाळेत गोरे बोलत होते. या वेळी पालकमंत्री शंभूराजे देसाई, आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे संचालक डॉ मल्लिकार्जुन कलशेट्टी आदी उपस्थित होते.

गोरे म्हणाले, की मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान म्हणजे विकासाभिमुख नेतृत्व सिद्ध करणारी स्पर्धा आहे. विकासाची भूमिका जनसामान्यापर्यंत पोहोचवली पाहिजे. ग्रामविकासाला बळ देणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. या उद्देशाने सर्वांना बरोबर घेऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान तयार करण्यात आले आहे. लोकसहभाग हा अभियानाचा मुख्य गाभा असून, त्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे. या अभियानाची १७ सप्टेंबर रोजी सुरुवात करण्यात येणार आहे. ग्रामस्तरावरील सर्व संस्थांना या अभियानात सहभागी करून घ्यावे.

शंभूराज देसाई यांनी, सातारा हा डोंगर-दऱ्यांमध्ये वसलेला जिल्हा आहे. लोककल्याणाच्या योजना ग्रामीण भागात सर्वदूर पोहोचल्या पाहिजेत. सार्वजनिक हिताची कामे नेटाने व पद्धतशीर झाली पाहिजेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे जिल्ह्यात यशस्वीपणे राबवले जावे, यासाठी ग्रामस्तरावर सर्व पदाधिकाऱ्यांनी झोकून देऊन काम करावे.

या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन आदींचे भाषण झाले. या वेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ग्रामपंचायतींच्या गौरव करण्यात आला.

गुणांकनामध्ये भेदभाव नाही मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सातारा जिल्ह्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा गौरव झालाच पाहिजे. मी या विभागाचा मंत्री असलो, तरी गुणांकनामध्ये भेदभाव केला जाणार नसल्याचे जयकुमार गोरे यांनी सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन व त्यांचे पती कार्तिकेयन एस हे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. मात्र या अभियानात दोन्ही जिल्हा परिषदेमध्ये स्पर्धा निर्माण होणार असे वक्तव्य गोरे यांनी करताच नागराजन यांनी सातारा जिल्हा परिषद राज्यात प्रथम क्रमांकावर राहील, अशी ग्वाही दिली.