शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज अपघाती निधन झालं. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर झालेल्या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मात्र, हा अपघात होता की घातपात? असा संशय आता व्यक्त होऊ लागला आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी चालकाच्या डुलकीमुळे हा अपघात झाला असण्याचा संशय व्यक्त केला असताना दुसरीकडे बराच वेळ रुग्णवाहिका न पोहोचणं, आजूबाजूच्या कुणीही मदत न करणं या गोष्टींवरून या घटनेमध्ये घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

नेमकं घडलं काय?

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीसाठी विनायक मेटे बीडहून मुंबईच्या दिशेने येत होते. रविवारी पहाटे ५ च्या सुमारास महामार्गावरील माडप बोगद्याजवळ त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत घोषित करण्यात आलं. मात्र, यावरून आता संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे.

आक्षेप काय?

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना या घडामोडींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघात झाला तेव्हा २ तास तिथे रुग्णवाहिका आली नाही. कोणतीही सुविधा मिळाली नाही. आजूबाजूला मदतीसाठी कुणी थांबलं नाही. येण्या-जाण्यातही बराच वेळ गेला. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. हा अपघात होता की घातपात होता? याची आम्हाला शंका आहे. हे सरकारनं तात्काळ जाहीर करावं. मराठा आरक्षणासाठी अजून सरकार किती बळी घेणार आहे? हा आमचा सरकारला सवाल आहे”, असं ते म्हणाले.

चालकाच्या डुलकीमुळे विनायक मेटेंच्या गाडीला अपघात? अजित पवार म्हणतात, “रात्रीच्या प्रवासामुळे…!”

चालकाचा दावा

दरम्यान, विनायक मेटे यांचा चालक एकनाथ कदम यानं दावा केल्याप्रमाणे पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाल्यानंतर सुमारे तासभर रुग्णवाहिका आलीच नाही. कंट्रोल रुमला फोन केल्यानंतर देखील तिथून तातडीने हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे या अपघात प्रकरणावर संशयाचे ढग जमा होऊ लागले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांचा चालकावर रोख

विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र चालकाच्या डुलकीमुळे अपघात झाला असण्याची शक्यता वर्तवली आहे. “रात्रभर प्रवास केल्यामुळे चालकाची झोप झाली नव्हती. त्यामुळे त्याला डुलकी आल्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे”, असं ते म्हणाले. तसेच, मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, त्यामध्ये सत्य काय ते समोर येईल, असं देखील अजित पवारांनी नमूद केलं.