Vinod Patil : महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे पाटील यांना दिलेल्या जीआरचा टाचणीएवढाही फायदा आणि उपयोग होणार नाही असं स्पष्ट मत मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि आंदोलक विनोद पाटील यांनी व्यक्त केलं आहे. मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी समोर येऊन या जीआरचा अर्थ समाजावून सांगावा अशीही मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.
काय म्हटलं आहे विनोद पाटील यांनी?
राधाकृष्ण विखे पाटील यांनी जो जीआर दिला त्यात काय लिहिलंय? कुठल्याही व्यक्तीला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर काय पुरावे लागतील? कुठलंही आरक्षण घ्यायचं असेल तर १९६७ पूर्वीचा पुरावा लागतो, त्याचा उल्लेख आहे. शेतमजूर आणि भूमिहीन असतील त्यांनी काय केलं पाहिजे याचा उल्लेख आहे. त्यासाठी गृह चौकशी अहवाल लागतो. तलाठ्यांनी तो द्यायचा आणि मग प्रमाणपत्र दिलं जातं. स्पष्टच सांगायचं झालं तर या जीआरचा टाचणीभरही फायदा किंवा उपयोग या कागदाचा नाही. मी ओबीसी नेत्यांना सांगतो आहे की ते या जीआरला आव्हान देणार आहेत. कदाचित कोर्ट त्यांचं प्रकरण दाखलही करुन घेणार नाही, कारण हा निर्णय नाहीच. ही फक्त प्रक्रिया आहे आणि ती कागदावर उतरवून दिली आहे. असं विनोद पाटील यांनी सांगितलं.
हैदराबाद गॅझेटचा उल्लेख…
पुढे विनोद पाटील म्हणाले, “सरसकटची अपेक्षा आम्हाला होती. कुणबी म्हणून जो जन्माला आला तो त्याला कुणबी मराठा प्रमाणपत्र मिळेल. सातत्याने हैदराबाद गॅझेटचा उल्लेख केला जातो आहे. हे संस्थान जेव्हा भारतात विलीन झालं त्यावेळी जो करार झाला त्यात हैदराबाद पॅक्टमध्ये दोनच गोष्टी होत्या निजामाची संपत्ती सुरक्षित राहिल आणि सुख सोयी सुखरुप राहतील. हैदराबाद गॅझेट वगैरे शब्द आणून काही उपयोग नाही. मराठा बांधवांना मी स्पष्ट सांगतो की या जीआरद्वारे नवीन काहीही मिळालेलं नाही. तुमचा समज असेल की आपला समावेश कुणबी म्हणून झाला आहे तर तसं ते नाही. कुणीही अधिकाऱ्यांशी वाद घालू नका.” असंही विनोद पाटील म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंचं समाधान कशामुळे झालं मला माहीत नाही-पाटील
मनोज जरांगेंचं समाधान कशामुळे झालं मला माहीत नाही. त्याबद्दल तेच उत्तर देऊ शकतील. मला जी कॉपी मिळाली की त्यात हैदराबाद गॅझेटचा उल्लेख आहे, तसंच देवगिरीचा उल्लेख आहे. त्यात असं लिहिलं आहे की ज्यांना ज्यांना वंशावळी प्रमाणे ज्यांच्याकडे पुरावे असतील जे जे मराठा कुणबी, कुणबी मराठा असतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्यांच्याकडे पुरावे नसतील आणि नातेवाईकांचे पुरावे असतील आणि त्यांच्याकडे गृह चौकशी अहवाल असेल त्याचा निर्णय स्थानिक समितीने घ्यावा. यात कुठेही लिहिलेलं नाही ज्यांच्याकडे पुरावे नाहीत जे कुणबी मराठा नाहीत, जे फक्त मराठा आहे त्यांना हे लागू होईल. त्यामुळे या जीआरचा उपयोग आम्हाला होणार नाही असंही विनोद पाटील यांनी सांगितलं. एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी विनोद पाटील यांनी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे भाष्य केलं.
विखे पाटील यांनी जरा जीआरचा अर्थ समजून द्यावा
समाज माझ्याकडे अपेक्षेनने बघतो. मी न्यायालयीन लढाई लढलो. छाती ठोकपणे सांगतो यातून एकाचही सर्टिफिकेट निघणार नाही. मागणारे मागत असतात मात्र समितीचे अध्यक्ष विखे पाटील यांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांनी मला जीआरचा अर्थ समजून सांगितला पाहिजे. आज हा जो कागद दिलाय याची जबाबदारी विखे पाटील यांनी घ्यावी आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्पष्टता द्यावी, असंही विनोद पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना मी श्रद्धांजली देऊ शकलो नाही, याची आम्हाला खंत वाटते, असंही विनोद पाटील यांनी सांगितलं. तसंच मागच्या वेळी एकनाथ शिंदे यांनी गुलाल उधळला होता, यावेळी विखे पाटील यांनी गुलाल उधळला. आम्हाला फक्त उत्तर द्यावं इतकीच आमची अपेक्षा आहे. मी १०० पैकी या जीआरला मायनस झीरो मार्क देतो असंही पाटील म्हणाले.