राज्याचे माजी मंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी त्यांच्या मतदारसंघातील दिग्रस येथे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नाट्यगृह आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व्यापारी संकुल या इमारतींच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमासाठी राठोड यांनी सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, महाराष्ट्राची ‘हास्य जत्रा’ फेम कलावंत अरुण कदम व समीर चौगुले यांना बोलावलं. त्यामुळे या कार्यक्रमात कलाकारांना पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. त्यामुळे आमदार राठोड यांच्यावर शासनाचे करोना नियम डावलून कार्यक्रमाला गर्दी जमवल्याचा आरोप होत आहे.

एकीकडे राज्यात वाढत्या कोविड संसर्गामुळे राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. असं असताना सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेचे आमदार विकास कामाचा मोठा वाजागाजा करत भूमिपूजन केले.

दरम्यान या कार्यक्रमाला गर्दी जमवण्यासाठी कलावंतांना बोलावण्यात आल्याचाही आरोप होतोय. सिने कलाकारांना बघण्यासाठी शहरासह परिसरातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केल्याने नियम फक्त सर्व सामान्य नागरिकांनाच आहेत का? असाही प्रश्न विचारला जातोय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; वाचा काय असतील निर्बंध!

महाराष्ट्रातील नवे निर्बंध खालीलप्रमाणे,

  • संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
  • लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील  उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
  • उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी  क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल.  अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
  • वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
  • उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील.  या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
  • याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी  त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.