विश्वास पवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नियमांचे उल्लंघन करत बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा हजारो भविकांच्या उपस्थितीत पार पडली. प्रशासनाने करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यात्रेला बंदी घातलेली असतानाही प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यात्रा पार पडल्याबद्दल शंभरावर ग्रामस्थांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात अजूनही अटकसत्र सुरूच आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी बंदी आदेश झुगारून ही यात्रा काढण्यात आली होती.

बगाडची मिरवणूक काढून प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बावधन येथील अडीच ते तीन हजार लोकांवर वाई पोलीस ठाण्यात तहसीलदार रणजित भोसले यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी ११० लोकांची नावे निष्पन्न झाली आहेत. आत्तापर्यंत यातील ९६ लोकांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्यांना रात्री न्यायालयाने पाच हजार रुपयांचा वैयक्तिक जामीन मंजूर केला आहे.

येथील दहा हजार लोकांनी एक एक करत एकत्र येत बगाड मिरवणूक पार पडल्याची माहिती मिळताच सातारा जिल्हा प्रशासन दबावाखाली आले.

बावधन (ता. वाई) येथील भैरवनाथाची बगाड यात्रा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी होते. संपूर्ण गाव परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केलेला असल्याने मागील आठ दिवसांपासून गावातील सर्व व्यवहार बंद होते. बगाड यात्रा होऊ नये यासाठी प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे, तहसीलदार रणजीत भोसले, पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर आदींनी गावामध्ये अनेक बैठका घेऊन ग्रामस्थांनी करोनाकाळामध्ये यात्रेला घातलेल्या बंदीबाबत जनजागृती करत गर्दी टाळण्यासाठी बगाड मिरवणूक करू नये, असे आवाहन केले होते.

पहाटे अचानक ग्रामस्थांनी बगाड रथ बांधून कृष्णा तीरावरून आणून तेथून वाजतगाजत गावात आणला. होळी पौर्णिमेच्या रात्री भैरवनाथ मंदिरात बगाड्या कौल लावून ठरविला जातो. दगडी चाके असलेला व संपूर्ण लाकडामध्ये बांधलेल्या बगाड रथाला बैलांच्या साह््याने ओढले जाते. एका वेळी किमान बारा ते सोळा बैल जोडून हा गाडा ओढला जातो. बगाड यात्रेसाठी दरवर्षी मोठी गर्दी होते. बगाड मिरवणूक निघाल्याचे समजताच भल्या पहाटे यात्रेला ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. परंपरेप्रमाणे बगाडाचा रथ बैलांच्या साहाय्याने ओढत गावात आणला. प्रशासनाने पहाटेच्या सुमारास कृष्णा नदी तीरावरील सोनेश्वर येथे ग्रामस्थांना बगाड मिरवणूक काढू नये, अशी विनंती पुन्हा एकदा केली. मात्र या बंदीला झुगारत ग्रामस्थांनी बगाड मिरवणूक काढली. या मिरवणुकीसाठी बाहेरील भाविकांची गर्दी टाळण्यात यश आले तरीही गावातील मोठ्या संख्येने ग्रामस्थ एकत्र आल्याने किमान दहा हजार भाविक या यात्रेत सहभागी झाल्याचे दिसून आले. मागील वर्षी करोना संसर्गामुळे यात्रेवर बंदी घातली होती. तरीही यात्रा केल्याने यात्रा कमिटीवर गुन्हा दाखल केला होता. असे असताना पुन्हा यात्रा भरविण्यात आली.

सातारा जिल्ह््यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशा वेळी समयसूचकता दाखवण्याची गरज होती. भावनांना आवर न घालता लोकप्रतिनिधींनी दुतोंडी बोलत जनतेला हवे तसे करण्यास साथ दिली. गावाने मोठ्या संकटाला निमंत्रण दिले आहे. बगाड यात्रा साजरी करून फार मोठी लढाई जिंकली अशा आविर्भावात काही जण असले तरी भविष्यात या निर्णयाची मोठी किंमत गावाला पुढेमागे चुकवावी लागण्याची शक्यता आहे. बावधनची बगाड यात्रा होते, तर आमच्या गावाच्या यात्रेला परवानगी का नाही, असाच सूर राज्यातून पुढे आला आणि बावधनच्या गनिमीकाव्याची परंपरा पुढे सुरू राहिली तर रुग्णालयाच्या बाहेर रुग्ण तडफडून मरताना दिसतील. बाजारात दिसणारी छोटी छोटी गर्दी गावागावांत करोनाला मोठे निमंत्रण देत आहे. बावधनच्या बगाड यात्रेतील गर्दी हा त्यातीलच एक भाग आहे. श्रद्धा, भावना आणि परंपरा जपण्यासाठी बावधनच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला धोबीपछाड दिला. आपणच केलेली लढाई जिंकली. मात्र चुकलेल्या लढाईचे समर्थन करता येणार नाही.

बावधन येथील बगाड यात्रेबाबत प्रशासनाने पुढाकार घेणाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. ज्यांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे त्यांच्यावर कारवाई होईल.

– बाळासाहेब पाटील, पालकमंत्री, सातारा

प्रशासनाच्या आदेशाचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सर्वांवर गुन्हा दाखल करणार आहे.

– धीरज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक, सातारा

आठ दिवसांपासून गावामध्ये येऊन गर्दी टाळण्यासाठी प्रशासन बगाड मिरवणूक करू नये म्हणून ग्रामस्थांना आवाहन करत होते. गावाचा परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केला होता. मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे अभिवचन दिले होते. तरीसुद्धा ग्रामस्थांनी नियमभंग करत बगाड यात्रा पार पाडली आहे. प्रशासन प्रशासनाच्या पद्धतीने काम करून संबंधितांवर आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करेल.

– प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violation of rules for the second year in a row in bawadhan abn
First published on: 06-04-2021 at 00:25 IST