‘महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या संस्थेत हिंसाचार वेदनादायी’ ; दत्तपूरच्या महारोगी सेवा समितीत वादंग

खोटय़ा तक्रारी झाल्याने संस्थेचे बँकेतील खाते गोठवण्यात आले आहे. बँकांनी चौकशी न करता एकतर्फी कारवाई केल्याने व्यवहार ठप्प झाला

डॉ. विभा गुप्ता यांची शासनाकडून हस्तक्षेपाची अपेक्षा

वर्धा : महात्मा गांधी यांनी स्थापन केलेल्या संस्थेत हिंसाचार होण्याची बाब वेदनादायी आहे. यामुळे कुष्ठरुग्णांची सेवा बाधित होऊन बरेवाईट झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल करीत डॉ. विभा गुप्ता यांनी शासनाकडून हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली.

महात्मा गांधी यांनी १९३८ मध्ये दत्तपूर येथे महारोगी सेवा समिती स्थापन केली. त्याद्वारे कुष्ठरोग रुग्णालय व पुनर्वसन केंद्र चालले जाते. सध्या शंभरावर रुग्ण येथे आश्रयाला आहेत. याठिकाणी ५ नोव्हेंबरला रामजी शुक्ल व त्यांच्या सहकाऱ्यांनी रुग्णालयात घुसखोरी करून कार्यालयाची तोडफोड करीत रोख ७० हजार रुपये, महत्त्वाची कागदपत्रे व इतर साहित्य लंपास केले. तसेच कुष्ठरोग्यांनाही कोंडून ठेवले. अशी तक्रार संस्थेच्या अध्यक्षा डॉ. विभा गुप्ता यांनी पोलिसांत केली. मात्र प्रशासनाने याबाबत ठोस पाऊल उचलले नसल्याची गांधीवाद्यांची खंत आहे.

या संदर्भात बुधवारी पत्रकार परिषदेत डॉ. विभा गुप्ता यांनी आपली भूमिका मांडली. ५ नोव्हेंबरच्या घटनेने गांधीवादी व सर्वोदयी वर्तुळ हादरले असल्याचे त्या म्हणाल्या. संस्थेशी संबंध नसलेल्या रामजी शुक्ल या व्यक्तीने बनावट तक्रारी करीत संस्थेला त्रास देणे सुरू केले. ते २०१९ मध्ये वर्धेत आले व व्यवस्थापक म्हणून काम पाहू लागले. संचालक मंडळाशी त्यांचा कोणताही संबंध नाही. खोटय़ा तक्रारी झाल्याने संस्थेचे बँकेतील खाते गोठवण्यात आले आहे. बँकांनी चौकशी न करता एकतर्फी कारवाई केल्याने व्यवहार ठप्प झाला. त्यामुळे शंभरावर कुष्ठरुग्णांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. येथील पन्नासावर पाळीव जनावरांची गैरसोय होत आहे. घुसखोरी करणाऱ्यांचा संस्थेच्या जमिनीवर डोळा आहे. हा हल्ला म्हणजे कट रचून टाकलेला दरोडाच आहे. मात्र संस्थेची लूट व सुव्यवस्थेचा भंग करूनही त्यांच्यावर कोणतीही कारवाई पोलिसांनी केली नाही, याची खंत वाटते, असे डॉ. गुप्ता म्हणाले. गांधीवादी परिवाराशी संबंध नसलेल्या व्यक्तीच हा आततायीपणा करीत असून गटबाजी असल्याचे खोटे चित्र रंगवले जात आहे. या संदर्भात ४८ गांधीवादी व अन्य संस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मदतीचे साकडे घातले आहे. गांधी विचार जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थांना अभय मिळणार की नाही, असा सवालही डॉ. गुप्ता यांनी केला. संस्थेच्या करुणा फुटाणे व अन्य पदाधिकारी तसेच कुष्ठरुग्ण यावेळी उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Violence in organization founded by mahatma gandhi zws