विरार येथील समुद्रात फेरीबोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता. कारण सफाळ्याच्या जालसार येथून निघालेल्या रो रो सेवेची बोट विरारच्या नारींगी येथील जेट्टीजवळ समुद्रात अडकून पडली होती. जेट्टीच्या रॅम्पचा हायड्रोलिक पंप तुटल्याने बोट जवळपास दीड तास अडकून पडली होती. विरारच्या समुद्र किनाऱ्यावर रविवारी संध्याकाळी साडेपाच वाजता सफाळ्याच्या जालसार येथून फेरीबोट निघाली होती. बोट प्रवाशांनी खच्चून भरली होती, विरारच्या नारिंगी जेट्टीजवळ ही बोट थांबणार होती. मात्र, येथे बोट अडकल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली, काही प्रवासी भयभीतही झाले होते. या घटनेतून प्रवासी वाचले आहेत. त्यानंतर सगळ्यांनीच सुटकेचा निश्वास सोडला आहे. समुद्र आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या घटनेबाबत पोस्ट केली आहे.

नितेश राणेंची पोस्ट नेमकी काय?

सफाळे ते विरार दरम्यान सुरु असलेली रो-रो प्रवासी बोट सेवा आज तांत्रिक बिघाडामुळे काही काळासाठी विस्कळीत झाली. म्हारंबळपाडा जेट्टीजवळ बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक यंत्रणेचा पाईप तुटल्याने बोट बंद पडली. या प्रकारामुळे प्रवाशांची काहीशी गैरसोय झाली. सदर घटनेची तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डच्या (MMB) अधिकाऱ्यांना बोटीची तांत्रिक दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर बोट जेट्टीवर सुरक्षितपणे पोहोचली. बोटीवरील सर्व प्रवासी आणि गाडया सुखरूप पणे उतरले आहेत. सदरील घटनेचा विस्तृत अहवाल देण्याचे आदेश महाराष्ट्र सागरी मंडळास दिले आहेत. अशी पोस्ट नितेश राणे यांनी केली आहे.

प्रवाशांनी नेमकं काय सांगितलं?

रँप हा एक उतार असलेला धातूचा किंवा मिश्र संरचनेचा प्लेटफॉर्म असतो, जो घाट जेट्टी आणि फेरीबोटच्या डेक यांना जोडतो. त्यावरून वाहनं फेरीवर चढतात आणि उतरतात. फेरी बोट जेट्टीवर आली की रॅम्प उचलला जातो. मात्र, रॅम्पला असलेला हायड्रोलिक पाईप अचानक तुटला. त्यामुळे प्रवासी बोटीत खोळंबले. या बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याचे सांगण्यात येतं आहे. बोट जेट्टीवर आणण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र, या रो रो बोटीवरील कर्मचारी यांना कोणतेही आपत्कालीन परिस्थितीत प्रशिक्षण दिलं नसल्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. सायकलच्या टायर ट्यूबने फुटलेला पाईप बांधून त्यांचे केविलवाणे प्रयत्न सुरू होते, असे बोटीतील प्रवाशांनी एबीपी माझाला सांगितलं.