स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या महान कार्यासाठी त्यांना ‘विश्वरत्न’ पुरस्कार देण्याची मागणी येथे आयोजित २८ व्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात करण्यात आली.
स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यास मंडळ, सावरकर प्रतिष्ठान (मुंबई) आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयातर्फे संयुक्तपणे आयोजित या तीनदिवसीय संमेलनाची काल सांगता झाली. या वेळी एकमताने मंजूर करण्यात आलेल्या ठरावांमध्ये, सावरकरांना विश्वरत्न पुरस्कार मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा, शालेय पाठय़पुस्तकांमध्ये सावरकरांच्या कविता व चरित्राचा समावेश व्हावा, गावोगावी सावरकर विचार मंच स्थापन करण्यात यावा, सावरकरांविषयी लेखन करणाऱ्या साहित्यिकांचे संमेलन भरवावे इत्यादींचा समावेश आहे. संमेलनाचा अध्यक्षीय समारोप करताना भिकू ऊर्फ दादा इदाते म्हणाले की, १९२० ते १९२५ या काळात देशात मोठे समाजपरिवर्तन झाले. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू राष्ट्रवाद मांडला. याच वेळी आलेल्या साम्यवादी विचारसरणीमुळे देशाच्या मूलतत्त्वाला धोका पोचत आल्याचे त्यांच्या लक्षात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या त्यांनी ते निदर्शनास आणून दिले. त्यातूनच १९२५ मध्ये संघाची स्थापना झाली. आजच्या काळातही सावरकरांचा हिंदुत्ववाद व हिंदुराष्ट्रवाद मुस्लिमांचा आणि उदासीन हिंदूंना समजावून सांगावा लागेल. सावरकरांचे हिंदूत्व धर्मनिरपेक्ष, जात-पात तोडणारे, अस्पृश्यतेचे समूळ निर्मूलन करणारे व यंत्रयुगाविषयी स्वागतशील आहे. पण तथाकथित पुरोगामी व्यक्ती व संघटनांनी अल्पसंख्यांक व बहुसंख्याकांना समान न्याय देणाऱ्या सावरकरांच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेबाबत गैरसमज पसरवून मोठे नुकसान केले. यापुढील काळात हिंदू-मुस्लीम संबंध जिव्हाळय़ाचे होण्यासाठी प्रयत्न करण्याचीही गरज इदाते यांनी व्यक्त केली.
वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅडव्होकेट पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या वाचनालयाच्या नामकरणापासून या संस्थेशी ऋणानुबंध आहे. यापुढील काळात त्यांच्या विचाराच्या प्रसारासाठी कटाक्षाने प्रयत्न करण्यात येतील.
संघ-भाजप कार्यकर्ते दूर
तीन दिवस चाललेल्या या संमेलनात सावरकरांचे सामाजिक विचार, परराष्ट्र धोरणविषयक विचार, प्रतिभावंत कवी, सावरकर घराण्याने देशासाठी केलेला उच्चतम त्याग इत्यादी विषयांवर व्याख्याने व परिसंवाद झाले. तसेच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले. सर्वसामान्य रत्नागिरीकरांनी या संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सावरकर जीवन व कार्याचे अभ्यासक डॉ. श्रीरंग गोडबोले यांनी आपल्या भाषणात संघाच्या निर्मितीमागे सावरकरांचीच प्रेरणा होती, असे मत व्यक्त केले. संमेलनाध्यक्ष इदाते यांनीही समारोपाच्या भाषणात या निरीक्षणाला सहमती दर्शवली. मात्र रत्नागिरीतील संघ-भाजपाचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या संमेलनापासून दूरच राहिल्याचे चित्र होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vishwa ratna award demand for savarkar in sahitya sammelan
First published on: 02-02-2016 at 01:01 IST