सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील धनगरवाडीमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत मतदारांनी उमेदवारांना नाकारून ‘नोटा’ ला सर्वाधिक पसंती दिल्यामुळे प्रशासन सतर्क झाले. वरिष्ठांच्या आदेशानंतर अखेर ‘नोटा’ नंतर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आलं आहे.

खंडाळा तालुक्‍यातील ५७ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. त्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. ५० ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. मतमोजणीत धनगरवाडी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी ‘नोटा’लाच उमेदवारांपेक्षा अधिक पसंती दिल्याचे मतमोजणीत दिसून आले. या ग्रामपंचायतीत सात जागा असून, तीन जागा यापूर्वीच बिनविरोध झाल्या होत्या. दोन जागांवर अर्ज न आल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत. उर्वरित दोन जागांसाठी निवडणूक प्रक्रिया झाली. त्यामध्ये ग्रामस्थांनी ‘नोटा’ला अनुक्रमे २११ व २१७ असे मतदान केले.

या प्रभागामध्येच जयवंत पिराजी मांढरे यांना १९ व ज्ञानेश्वर निवृत्ती पाचे यांना १३८ मते मिळाली. या दोन्ही उमेदवारांपेक्षा ‘नोटा’ला (२११) जास्त मते मिळाली. तसेच, याच प्रभागामध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव गटात चंद्रभागा भगवान कदम यांना १२५, तर चैत्राली रामदास कदम यांना २६ मते मिळाली. येथेही ‘नोटा’ला (२१७) उमेदवारांपेक्षा अधिक मते मिळाली. असा प्रकार ग्रामपंचायत निवडणुकीत जिल्ह्यात प्रथमच घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथील निवडणूक निकाल जाहीर काय करायचा असा प्रश्‍न निवडणूक अधिकाऱ्यांना पडला. निवडणूक रद्द करावी लागेल व फेर निवडणूक घ्यावी लागण्याचा प्रसंग ओढवला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अखेर तहसीलदारांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागविले. जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी नोटा नंतर सर्वाधिक मते मिळालेल्या उमेदवारांना विजयी घोषित करण्याचा निर्णय दिला. यामुळे ‘नोटा’नंतर सर्वाधिक मते मिळालेले उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले, अशी माहिती ग्रामपंचायतीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार दशरथ काळे यांनी दिली.