Walmik Karad बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण चर्चेत आहे. ९ डिसेंबर २०२४ या दिवशी त्यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. यानंतर या प्रकरणातल्या आरोपींना अटकही झाली. तर वाल्मिक कराड हा पोलिसांना ३१ डिसेंबरला शरण आला. दरम्यान सुरुवातीला संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींवर मकोका लावण्यात आला, काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडवरही मकोका लावण्यात आला. आता वाल्मिक कराड आणि हत्येतील आरोपींचं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे.

व्हायरल फुटेजमध्ये काय?

व्हायरल सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या केज येथील कार्यालयाबाहेर आहे. २९ नोव्हेंबरला वाल्मिक कराड या कार्यालयात आला होता. यावेळी वाल्मिक कराड याच्यासह संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करणारे प्रतीक घुले, सुदर्शन घुले आणि त्यांचे मित्र दिसत आहेत. विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयास्पद भूमिका राहिलेले आणि निलंबित झालेले पीएसआय राजेश पाटील हेदेखील वाल्मिक कराड यांना भेटल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत.

वाल्मिक कराड खंडणी मागण्यासाठी आला होता अशा चर्चा होत आहेत

वाल्मिक कराड खंडणी मागण्यासाठीच आला होता अशा चर्चा होत आहेत. राजेश पाटील यांचा विष्णू चाटेला हॉटेलमध्ये भेटतानाचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसऱ्या व्हिडीओमध्येही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या वाल्मिक कराडच्या गँगसह राजेश पाटील दिसून आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अवादा कंपनीकडून खंडणी मागितली त्यादिवशी राजेश पाटील हे वाल्मिक कराडला का भेटले असावेत? हा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.

हे पण वाचा- वाल्मिक कराडबरोबर आर्थिक हितसंबंध? धनंजय मुंडे स्पष्टच बोलले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन कोटींची खंडणी, वॉचमनला मारहाण आणि…

विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेर हे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराडच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वाल्मिक कराडच्या वतीने विष्णू चाटेने अवादा कंपनीकडे तब्बल दोन कोटींची खंडणी मागितली होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन अवादा कंपनीत गेला होता. त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला. हा सुरक्षारक्षक संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील होता. त्यामुळे संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला होता. यानंतर ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.