वर्धा जिल्ह्यात करोनाबाधित रूग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर व दोन दिवस पूरेल एवढाच लसींचा साठा शिल्लक असल्याने खासदार रामदास तडस यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.

खासदार तडस यांनी आज एका पत्राद्वारे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचे या परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. जिल्ह्यात करोना चाचणीचे प्रमाण वाढल्याने करोनाबाधितांची संख्या लक्षणीय प्रमाणात दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा तोकडी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.

तसेच, जिल्हा प्रशासनाच्या माहितीनूसार २ दिवस पूरेल एवढाच लसींचा साठा उपलब्ध आहे. जिल्हा प्रशासनाने २ लाख कोविशील्ड व ४ हजार कोवॅक्सिन तसेच २० व्हेंटिलेटरची मागणी नोंदविली आहे. ८ एप्रिलपर्यत २१ हजार ३५१ रूग्णांची नोंद झाली आहे. तर, ४८३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजही २ हजार २३७ बाधितांची संख्या आहे. रूग्णांची तसेच मृत्यू संख्या वाढू नये म्हणून प्रयत्न करण्याची आपलीच जबाबदारी असल्याचेही खासदार तडस यांनी सांगितले आहे.

केंद्रीय पथकाने करोना विषयक स्थितीचा नुकताच आढावा घेतला आहे. या अनुषंगाने तातडीची उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. सुरू असलेल्या टाळेबंदीने आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहे. मात्र करोनाचे संक्रमण थांबलेले नाही. ही स्थिती अधिकच भयावह होण्यापूर्वी जिल्ह्यात आवश्यक त्या बाबींची त्वरीत पूर्तता करावी, अशी विनंतीही करण्यात आली आहे.