वर्धा येथे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळातील प्रलंबित मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षकांनी आज(सोमवार) जिल्हा परिषदेसमोर जोरदार निदर्शने करीत आक्रोश व्यक्त केला.
राज्य प्राथमिक शिक्षक समितीतर्फे आज राज्यभर हे आंदोलन करण्यात येत आहे, प्रलंबित प्रश्नांसाठी शेकडो निवेदने देण्यात आली, सातत्याने पाठपुरावा केला, मात्र वरिष्ठ पातळीवर अजिबात दखल नाही. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची शासनाची भूमिका उदासीनतेची असल्याचा आरोप संघटनेचे राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांनी केला.
भेदभाव न करता वर्ग पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळावा, बीपीएल कुटुंबातील विद्यार्थिनींच्या उपस्थिती भत्ता एक ऐवजी २५ रुपये करावा, वेतन आयोगातील त्रुटी दूर व्हाव्या, जिल्ह्या अंतर्गत बदल्या शिक्षक संघटनांशी चर्चा करून व्हाव्यात, वेतन वेळेवर नियमानुसार व्हावे अशा व अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत. यासाठी शिक्षक समितीच्या अनेक शिक्षकांनी जिल्हा परिषदेपुढे आज धरणे आंदोलन करीत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.