गृह विलगीकरणात असणाऱ्या रूग्णांनी निर्देशांचे पालन करावे म्हणून, आता त्यांच्यावर निगराणी ठेवण्याची जबाबदारी महिला बचत गटांकडे सोपविण्यात आली आहे. वर्धा पालिका क्षेत्रात अशी निगराणी ठेवण्याची भूमिका वर्धा नगर पालिकेने घेतली आहे.

सौम्य लक्षणे असणाऱ्या करोना रूग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्याची भूमिका शासनाने घेतली आहे. मात्र शासनाच्या या निर्देशाचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आहे. विलगीकरण टाळून बाहेर फिरणाऱ्या अशा रूग्णांच्यामार्फतच करोनाचे संक्रमण वाढत असल्याची चिंता आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे. म्हणून अशा रूग्णांना दोन हजार रूपयांचा दंड आकारल्या जातो. मात्र दंडासही न जुमानणाऱ्या रूग्णांच्या हालचाली वाढतच आहे. असा रूग्ण संक्रमणासाठी कराणभूत ठरत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर निगराणी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्याधिकारी विपीन पालिवाल यांनी नमूद केले आहे.

तसेच, या निगराणीसाठी काही महिला बचतगटांची देखील निवड करण्यात आली आहे. बचतगटांच्या सदस्य गृह विलगीकरणातील रूग्णांच्या घरी रोज भेटी देतील. निर्देशांचे पालन होत आहे अथवा नाही याची पडताळणी केल्या जाईल. त्यामूळे अशा रूग्णांना घराबाहेर पडण्यास अटकाव होईल, असा विश्वाास पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. या सोबतच नगरपालिकेच्या शिक्षकांचे तीन पथक निगरानीसाठी तयार करण्यात आले आहेत आणि १८००२७०६७०० हा टोल फ्री क्रमांक देखील पालिकेने सुरू केला आहे. १४ दिवसांच्या गृह विलगीकरणातील रूग्ण घराबाहेर फिरतांना आढळल्यास या क्रमांकावर तक्रार करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.