कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात मुसळधारांचा इशारा
पुणे : पावसाला पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर राज्याच्या बहुतांश भागांत पावसाने पुन्हा जोर धरला आहे. गेल्या २४ तासांत झालेल्या पावसाने मराठवाडय़ाला तडाखा दिला. हिंगोलीत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. बीड जिल्ह्य़ात काही ठिकाणी पिके वाहून गेली.
कोकण विभागात मुंबई-ठाण्यासह सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस होता. मध्य महाराष्ट्रातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. विदर्भातही काही ठिकाणी पावसाची हजेरी होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात चार दिवस पावसाचा जोर राहणार आहे. या दरम्यान काही भागांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात सध्या पावसाला अनुकूल स्थिती आहे. कोकण विभागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही पाऊस झाला आहे. सध्या मराठवाडा आणि लगतच्या भागांमध्ये वाऱ्यांची चक्रीय स्थिती असल्याने गेल्या २४ तासांत या भागात काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. या क्षेत्रामुळेही राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील तीन ते चार दिवस पाऊस होणार आहे. ६ आणि ७ सप्टेंबरला काही ठिकाणी मुसळधार पाऊस ते अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळातही पाऊस सक्रि य राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडय़ाला तडाखा
मराठवाडय़ाच्या विविध भागांत शनिवारी रात्री पावसाने तडाखा दिला. मराठवाडय़ातील ८५ मंडळांमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली. जालन्यातील पाचनवाडी येथे सर्वाधिक १८५ मिलिमीटर नोंद झाली आहे. बीडमधील गेवराईतील १० मंडळ, उस्मानाबादमधील भूम-परंडा तालुक्यातील ९ मंडळ तर औरंगाबादमधील पैठण तालुक्यातील ६ मंडळांमध्ये मुसळधारांची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्य़ात पिकांचे नुकसान
बीड जिल्ह्य़ातील अकरापैकी सात तालुक्यांतील माजलगाव (७६.७३ टक्के) प्रकल्पात ४१ हजार २०० कुसेक पाण्याची आवक सुरू आहे. तर मांजरा धरणातील पाणीसाठा ५० टक्कय़ांवर गेला आहे. शिरूर कासार, तर गेवराई तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला. सिंदफना, मणकर्णिका, कडी, अमृता या नद्यांना पूर आला आहे. सिंदफणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून परिसरातील पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत.
सांगली, मिरजेत दमदार पाऊस
सांगली जिल्ह्य़ाच्या पूर्व भागातील जत, कवठेमहांकाळसह सांगली, मिरजेत रविवारी दुपारी दमदार पावसाने हजेरी लावली. जतमध्ये दुपारी एक तास जोरदार पाऊस झाला. काढणीला आलेल्या सोयाबीनला या पावसाचा तडाखा बसण्याची भीती व्यक्त केली जात असली, तरी अन्य खरीप पिकांना पावसाचा फायदा होणार आहे. तसेच रब्बी हंगामाच्या तयारीसाठी दमदार पाऊस उपयुक्त ठरणार आहे.
पाऊसभान..
’मुंबई, ठाणे परिसरात ७, ८ सप्टेंबरला जोरदार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्य़ांत ९ सप्टेंबपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
’रायगड जिल्ह्य़ात ७ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा असून, किनारपट्टीवर सोसाटय़ाचा वारा वाहणार आहे.
’पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत ६ किंवा ७ सप्टेंबरपासून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.
’नाशिकमध्ये ८ सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा आहे. मराठवाडय़ात पुढील दोन ते तीन दिवस पावसाचा अंदाज आहे.
’विदर्भातही नागपूर, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, बुलढाणा जिल्ह्य़ांत पाऊस कोसळेल.
दोन बळी : हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील चिंचोर्डी शिवारामध्ये ओढय़ाला आलेल्या पुराच्या पाण्यात एक सहा वर्षांची मुलगी वाहून गेली तर औंढा नागनाथ तालुक्यातील नंदगाव येथेही एक शेतकरी वाहून गेला. या दोघांचेही मृतदेह रविवारी सकाळी सापडले.
