मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर २ ऑक्टोबर रोजी केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच एनसीबीने म्हणजेच राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमध्ये भाजपाचे नेते मोहित कम्बोज यांचा मेहुणा ऋषभ सचदेवालासुद्धा ताब्यात घेण्यात आल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. आज मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी एनसीबीने ११ जणांना क्रूझवरुन ताब्यात घेतल्यानंतर तीन जणांना भाजपा नेत्यांच्या आदेशाने सोडून देण्यात आल्याचा आरोप केला. या आरोपांवर स्पष्टीकरण देताना एनसीबीने हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना आम्ही योग्य पद्धतीने तपास करुन १४ लोकांना ताब्यात घेतलं, त्यानंतर ज्यांच्याविरोधात पुरावे सापडले नाही त्या सहा सोडून दिलं असं म्हटलं आहे. या पत्रकार परिषदेमध्ये एनसीबीच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार या क्रूझवर होते का? असाही प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.

त्या सोडून देण्यात आलेल्या सहा जणांमध्ये उपमुख्यमंत्र्यांचे पुत्र असणारे पार्थ पवार होते का? असा प्रश्न एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पत्रकारांनी विचारला असता वानखेडे यांनी यावर उत्तर दिलं. “तुम्ही जी नावं विचारत आहात त्यावर एकच सांगू शकेल की प्रकरणाचा तपास सुरु आहे तर नावं सांगणं योग्य ठरणार नाही. आम्ही फार जबाबदार संस्थेसाठी काम करतो. आम्ही असं कोणतंही वक्तव्य करु शकणार नाही. आम्ही फक्त पुरव्यांच्या आधारे बोलतो.” असं वानखेडे म्हणाले.

मलिक यांनी काय आरोप केलेत?
१३०० लोक असणाऱ्या जहाजावर तुम्ही छापा टाकला. १२ तास सुरु असलेल्या छाप्यात ११ लोकांना ताब्यात घेत एनसीबीच्या कार्यालयात नेलं. तीन जणांना का सोडलं?, याचं उत्तर एनसीबीला द्यावं लागेल असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना मलिक यांनी दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत भाजपाच्या नेत्यांनी फोन करुन या तिघांना सोडण्यास सांगितल्याचा आरोपही केला. सोडण्यात आलेल्या लोकांमध्ये आमीर फर्निचरवाला, ऋषभ सचदेवा, प्रतिक गाबा यांचा समावेश होता असं मलिक म्हणाले आहेत.