लोकसभा निवडणुकीत उमेदवार अथवा राजकीय पक्षांच्या खर्चावर जिल्हास्तरीय खर्च संनियंत्रण कक्षाची करडी नजर राहणार आहे. जिल्हाधिकारी एस. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात बठक झाली. दरम्यान, परभणी मतदारसंघासाठीचे निवडणूक खर्च निरीक्षक चुनाराम येथे दाखल झाले आहेत.
बठकीत निवडणूक खर्चासंदर्भात घ्यावयाची खबरदारी याबद्दल माहिती देण्यात आली. उमेदवार व राजकीय पक्षांच्या प्रत्येक खर्चावर निवडणूक आयोगाची नजर राहणार आहे. प्रत्येक खर्चाचा तपशील कक्षाला कळविणे बंधनकारक आहे. उमेदवाराने आपल्या खर्चाचे दैनंदिन लेखे विहीत नमुन्यात ठेवणे, उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी कोणतीही सभा अथवा पदयात्रेची परवानगी मागताना संभाव्य खर्चाचा आराखडा सादर करणे आवश्यक आहे.
प्रचार साहित्यावर विशिष्ट पक्षाचे चिन्ह असेल, तर असा खर्च संबंधित पक्षाच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. परंतु प्रचार साहित्यावर उमेदवाराचा फोटो, नाव असेल तर तो खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. उमेदवाराचे स्वमालकीचे वाहन असेल, तर अशा वाहनाचा फक्त इंधन व चालकाचा खर्च उमेदवाराच्या खर्चात समाविष्ट केला जाईल. मात्र, उमेदवारांच्या इतर वाहनांचा खर्च त्यावर घोषित दराप्रमाणे उमेदवारांना द्यावा लागणार आहे. त्याची नोंद खर्च संनियंत्रण कक्षाकडे द्यावी लागणार आहे. उमेदवाराने त्यांच्या निवडणूक प्रतिनिधीचे सर्व तपशील जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळविणे आवश्यक असून, निवडणुकीचा खर्च निकालाच्या दिवसापर्यंत गणला जाईल. उमेदवारांनी दाखल करावयाच्या खर्चाबाबतचे नमुने जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त करून घ्यावेत. कोणत्याही प्रकारे या बाबत अज्ञानाची सबब चालू शकणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. उपजिल्हाधिकारी (निवडणूक) महेश वडदकर, कोषागार अधिकारी तथा खर्च संनियंत्रण कक्षाचे प्रमुख अभय चौधरी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Watch of ward to outlay on candidate
First published on: 21-03-2014 at 01:40 IST