सांगली : कोयनेच्या पाण्याचे केवळ कागदोपत्री नियोजन न करता पुढील पावसाचा हंगाम सुरू होईपर्यंतचे पाण्याचे नियोजन करण्यात यावे, दहा टक्के पाणी कपात न करता वीज निर्मितीसाठी वापरण्यात येणारे पाणी सिंचन व पिण्यासाठी उपलब्ध करावे या मागणीसाठी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरूण लाड यांच्या नेतृत्वाखाली सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
आमदार लाड म्हणाले, आज केवळ एक टीएमसी पाणी सोडून लोकांच्या तोंडाला पाणी पुसण्यापेक्षा पुरेसे पाणी कृष्णा नदीत सोडावे. तसेच कोयना, वारणा नदीत ही पाणी सोडण्याचे वर्षभराचे नियोजन व्हावे. कालवा समितीची बैठक तातडीने बोलवावी, शासनाला खासगी कंपन्यांकडून स्वस्त दरात वीज मिळते ती घेऊन, मग कोयना धरणातून ६७.५०टीएमसी पाणी वीजनिर्मिती करून ते समुद्रात मिसळते त्यातील पाणी वाचवून ते पाणी सिंचन आणि पिण्यासाठी वापरले तर परिसराचा दुष्काळ कायमस्वरूपी संपेल.
आणखी वाचा-सातारा : ‘बियर प्रणित विकास नको’ महाराष्ट्र अंनिसची भूमिका
यावेळी आमदार नाईक म्हणाले, २९ तारखेला जी बैठक होणार आहे त्या बैठकीला सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बोलवावेत. या बैठकीत केवळ कागदोपत्री सादरीकरण न करता दिलासादायक निर्णय घेण्यात यावा. आमदार श्रीमती पाटील यांनी दुष्काळी स्थितीत पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, टी व्ही पाटील, बाळासाहेब होनमोरे, देवराज पाटील, दत्ता पाटील, गौरव नायकवडी आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोयनेतून पाणी सोडले
कृष्णा कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून याबाबत सातार्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याशी चर्चा करून कोयनेतून पाणी सोडण्याची विनंती केली. याची तातडीने दखल घेउन आजच कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी दुपारी कोयना धरणातून १ हजार ५० ययुसेयस प्रतिसेकंद पाणी पायथा विद्युतगृहातून सोडण्यात येत असल्याचे आमदार अनिल बाबर यांनी सांगितले.