राहाता: निळवंडेच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाने धरणात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. धरणातील पाण्याची पातळी राखण्यासाठी डाव्या आणि उजव्या कालव्यांना १५ जुलैपासून पाणी सोडण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. दरम्यान पाणी सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातील संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री विखे यांच्याकडे केली होती. यामुळे पाणी कोणाच्या मागणीनुसार सोडण्यात येणार यावरून संगमनेर तालुक्यात आमदार खताळ व माजी मंत्री थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.
निळवंडेच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांना मिळावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांकडून झाली होती. पाणलोटात पावसाचे प्रमाण अधिक असले तरी लाभक्षेत्रात अपेक्षेइतका पाऊस न झाल्याने खरीप पिकांना धोका पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विखे यांनी जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडून माहिती घेवून येत्या १५ जुलैपासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना दिल्या.या निर्णयामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, पाणीयोजनांना आवर्तनाचा लाभ मिळणार असल्याने शेती बरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्यास मोठी मदत होईल.
श्रेयवादाची लढाई
निळवंडे धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यांना पाणी सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जलसंपदा तथा पालकमंत्री विखे यांच्याकडे आज, बुधवारी लेखी पत्राद्वारे केली होती. या दोन्ही आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या पत्राची विखे यांनी तातडीने दखल घेऊन निळवंडे कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना जलसंपदाला दिल्या आहेत. कालव्यांना पाणी कोणाच्या मागणीनुसार सोडण्यात येणार यावरून संगमनेर तालुक्यात आमदार खताळ व माजी मंत्री थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे.