कराड : पश्चिम घाटक्षेत्रातील सर्वदूरचा जोरदार आणि कोयना पाणलोटात कोसळणारा मुसळधार पाऊस आज बुधवारी दिवसभरात बऱ्यापैकी ओसरल्याने कोयना धरणातील जलआवक १० हजार क्युसेकहून (प्रतिसेकंद घनफूट) अधिकची घटली. पावसाचे हे ओसरणे असे सुरू राहिल्यास कोयनेतून होणारा तब्बल ९५,३०० क्युसेकचा जलविसर्ग कमी होवून कृष्णा- कोयना नद्यांकाठचा पुराचा विळखा सैलावण्याचा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, कोयनेसह बहुतांश धरणांमधील विसर्ग मात्र काहीसा कमी झाला आहे. मात्र, पूर आणि पावसामुळे जनजीवन विस्कळीतच राहताना शेतापिकांचे नुकसान, स्थावर मिळकती व घरांची पडझड असे प्रकार समोर आले आहेत.
कोयना धरणाच्या पाणलोटात आज बुधवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४३.३३ मिमी पाऊस झाला आहे. काल हाच पाऊस १४२.६६ मिमी (५.६२ इंच) असा नोंदला गेला होता. तर, कोयना धरणातील जलआवक १,२१,७०० क्युसेकवरून १,११,१६६ क्युसेकपर्यंत खाली आली आहे. मात्र, कोयना धरणाचे सहा वक्री दरवाजे १३ फूट उघडून कोयना नदीपात्रात होणारा ९३ हजार २०० क्युसेकचा (प्रतिसेकंद घनफूट) जलविसर्ग कायम आहे. कोयनेतील पाण्याची आवक घटल्याखेरीज धरणातून होणारा हा प्रचंड जलविसर्ग कमी होणार नसल्याने तूर्तास तरी, कृष्णा- कोयना नद्यांकाठची पूरस्थिती गतीने निवळणार नसल्याचे दिसते आहे.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता कोयनेचा धरणसाठा १०१.४६ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजेच ९६.४० टक्के झाला आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे १३ फुटांनी उघडून कोयना नदीपात्रात ९३,२०० क्युसेक तर, पायथा वीजगृहातून २,१०० असा ९५,३०० क्युसेकचा प्रचंड जलविसर्ग सुरू आहे. मात्र, सातारा जिल्ह्यातील अन्य धरणांमधील जलविसर्ग काहीसा कमी झाला आहे. त्यात धोम धरणातून होणारा १४,५१० क्युसेकचा विसर्ग ९,८२६ क्युसेक, ‘कण्हेर’मधून होणारा १२,००० क्युसेकचा विसर्ग ५,१५६ क्युसेक, ‘उरमोडी’तून होणारा ५,७०५ क्युसेकचा विसर्ग ४,३६७ क्युसेक असा कमी झाला आहे. एकूणच पावसाबरोबरच धरणांमधील जलविसर्ग काहीसा घटला असलातरी कृष्णा- कोयनेसह त्यांच्या उपनद्यांची पूरस्थिती कायम दिसते आहे. दरम्यान, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा, पाटण, कोयनानगर येथून पूरस्थितीचा आढावा घेतला. आमदार डॉ. अतुल भोसले यांनीही कराडमध्ये नद्यांकाठी शासकीय यंत्रणेसमवेत पाहणी करून आढावा घेत उपाययोजनांबाबत सूचना केल्या आहेत.
कोयनेत १३० टीएमसीची आवक
कोयना जलाशयात आजवरच्या हंगामात पाण्याची विक्रम आवक झाली. १०५.२५ टीएमसी (अब्ज घनफूट) क्षमतेच्या कोयना धरणात आजवर जवळपास १३० टीएमसी म्हणजेच एकूण धरण क्षमतेच्या तब्बल १२३.५१ टक्के पाण्याची आवक झाली आहे.
कोयना जलाशयात जलपूजन
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज कोयना धरणातील पाण्याचे विधिवत पूजन करून, खणा, नारळाने ओटी भरण्यात आली. या वेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, कोयना सिंचन विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता महेश रासनकर, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदींची उपस्थिती होती.