कराड : कोयना पाणलोटात चालू हंगामात वार्षिक सरासरीपेक्षा जास्तीचा पाऊस होताना, कोयनेत आत्तापर्यंत धरणक्षमतेच्या दीडपट पाण्याची भरघोस आवक झाली आहे. १०५.२५ टीएमसी (अब्ज घनफूट) क्षमतेच्या कोयना शिवसागरात यंदा आत्तापर्यंत १५७.९५ टीएमसीची (एकूण धरण क्षमतेच्या १५०.०७ टक्के) जलआवक झाली आहे.
कोयना धरणाच्या तांत्रिकवर्षास एक जूनपासून प्रारंभ होताना, कोयना पाणलोटात गेल्या दोन दिवसांपूर्वी एकूण सरासरीपेक्षा ज्यादाच्या पावसाचा टप्पा ओलांडला गेला. तर, आज रविवारी अखेर धरणात १५० टक्के जलआवक पूर्ण झाल्याची आकडेवारी समोर आली. या एकूण पाण्यापैकी धरणसाठा नियंत्रणासाठी कोयनेच्या सहा वक्री दरवाजातून विनावापर ५२.३५ टीएमसी तर, पायथा वीजगृहातून १०.१७ टीएमसी, असे ६२.५२ टीएमसी (धरण क्षमतेच्या ५९.४० टक्के) पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात आला आहे.
सध्या कोयनेचा जलसाठा १०३.९५ टीएमसी (९८.७६ टक्के) असून, धरणात १३ हजार ८११ क्युसेकची (प्रतिसेकंद घनफूट) जलआवक होत आहे. कोयनेतील हा जलसाठा समाधानकारक असून, त्यामुळे कोयनेतून होणाऱ्या वीजनिर्मिती आणि धरणाखालील कृष्णा- कोयना नद्यांकाठी पुरवल्या जाणाऱ्या पाण्याचा वर्षाभराचा प्रश्न मिटला आहे.
सध्या धरणाचे दरवाजे एक फुट उघडले गेल्याने त्यातून ९ हजार १०० क्युसेक, पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक अशा ११ हजार २०० क्युसेक पाण्याचा कोयना नदीपात्रात विसर्ग होत आहे.कोयनेच्या पाणलोटात रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत नवजाला १० एकूण ५ हजार ४८१ मिमी., महाबळेश्वरला २९ एकूण ५,२९८ मिमी. तर, कोयनानगरला केवळ दोन एकूण ४ हजार ३८४ मिमी. पावसाची नोंद आहे. हा एकूण सरासरी पाऊस ५,०५४.३३ मिमी. (वार्षिक सरासरीच्या १०१.०८ टक्के) नोंदला गेला आहे.