Heavy Rain Update: कराड : कोयना पाणलोटात पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर परवा शुक्रवारी रात्रीपासून पावसास सुरुवात झाली आहे. दरम्यान, जोरदार पाऊस टप्याटप्याने पूर्णतः ओसरल्याने धरणाच्या दरवाजातील जलविसर्ग बंद करण्यात आला आहे. तर, दुसरीकडे गेल्या दोन दिवसांत पावसाने धरणातील जलआवक आठपट वाढली आहे.
सध्या कोयना धरणातील पाण्याची आवक ५,८६१ क्युसेक (प्रतिसेकंद घनफूट) असून, धरणाच्या पायथा वीजगृहातून २,१०० क्युसेकचा जलविसर्ग कायम आहे. तसेच कोयनेचा जलसाठा १०३.४१ टीएमसी (अब्ज घनफूट) म्हणजे ९८.२५ टक्के झाला आहे.
कोयना पाणलोटात पावसाचा रात्रीचा जोर तर, दिवसाची ओढ ही तऱ्हा याखेपेसही दिसून येत असून, काल शनिवारी रात्री धरणक्षेत्रात ६२ मिमी पाऊस झाला. मात्र, आज दिवसभरात पाऊसच झालेला नसून, शासकीय तक्त्यावर तो निरंक (शून्य मिमी.) दिसत आहे. कोयना पाणलोटात चालू हंगामात आत्तापर्यंत एकूण सरासरी पाऊस ५,१४९. ३३ मिमी. म्हणजेच १०२.९८ टक्के नोंदला गेला आहे. त्यात नवजाला सर्वाधिक ५,६६१ मिमी., खालोखाल महाबळेश्वरला ५,३२२ मिमी. तर, कोयनानगरला ४,४६५ मिमी. अशी हंगामातील आत्तापर्यंतच्या पावसाची नोंद आहे.