अकोले: निळवंडे धरणातून २४ तासांत एक टीएमसीपेक्षा जास्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. पाणलोट क्षेत्रात रविवारीही मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे भंडारदरा व निळवंडे धरणांमधून प्रवरा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे.
पाणलोटातील मुसळधार पावसामुळे भरत आलेल्या भंडारदरा व निळवंडे धरणांमधून शनिवारपासूनच प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. निळवंडे धरणातून विसर्ग १५ हजार क्युसेकपर्यंत वाढवला होता. आज, सोमवारी सकाळपर्यंतच्या चोवीस तासांत १ हजार १२२ दलघफू पाणी धरणातून बाहेर पडले. यातील ५८ दशलक्ष घनफूट पाणी कालव्यात सोडण्यात आले, तर १ हजार ६४ दलघफू पाणी सांडवा आणि वीजनिर्मिती केंद्रातून नदीत सोडण्यात आले. हे पाणी जायकवाडीकडे गेले. आज सकाळी निळवंडेतून १३ हजार ९५० क्युसेक विसर्ग सुरू होता.
भंडारदऱ्यात चोवीस तासांत ९३२ दलघफू पाणी आले. त्यातील ७५९ दलघफू पाणी धरणातून नदीपात्रात सोडण्यात आले. आज ‘भंडारदरा’तून ९ हजार २५१ क्युसेक विसर्ग सोडला होता. त्यातील ८ हजार ४१६ क्युसेक विसर्ग स्पिलवेमधून सुरू होता.
सोमवारी सकाळी भंडारदराचा पाणीसाठा ९ हजार ७१४ दलघफू (८८ टक्के) होता, तर निळवंडेत ७ हजार ४११ दलघफू (८८.९९ टक्के) पाणीसाठा होता. मुळा धरण ८४ टक्के भरले आहे. सायंकाळी धरणाचा पाणीसाठा २१ हजार ७०६ दलघफू होता. आज सायंकाळी कोतुळजवळ मुळा नदीतून ६ हजार ५९२ क्युसेक पाणी वाहत होते. आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासातील पाऊस मिमीमध्ये भंडारदरा ६१, घाटघर १०९, पांजरे ७९, रतनवाडी १११, वाकी ५४, निळवंडे १९, आढळा धरण ११, अकोले १७.