बांधकाम व्यावसायिकांच्या ‘क्रेडाई’ या संस्थेच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी चार हजार लिटरच्या १०० पाण्याच्या टाक्या महसूल आयुक्त, जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आल्या. दुष्काळग्रस्तांच्या गावांमधील तळे व बंधाऱ्यांमधील गाळ काढणे, त्यामधील पाणी क्षमता वाढविण्यासाठी मदत करणे, येवला तालुक्यातील हरीण, मोर व इतर प्राण्यांसाठी तीन महिने पाणीपुरवठा सुरू करण्याचा निर्णयही क्रेडाईने घेतला आहे.
याप्रसंगी क्रेडाईचे अध्यक्ष किरण चव्हाण यांनी आपण सर्वानी एकजुटीने या दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करू या, असे आवाहन केले आहे. महसूल आयुक्तांनी दुष्काळी भागासाठी मदत करणाऱ्या क्रेडाई या संस्थेने समाजाला एक आदर्श दिला असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमास केड्राईचे माजी अध्यक्ष सुनील भायभंग, अविनाश शिरोडे हेही उपस्थित होते.