मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील दहीहंडी उत्सवाला हजेरी लावली. यावेळी केलेल्या भाषणातून एकनाथ शिंदे यांनी राजकीय टोलेबाजी केली आहे. दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील ५० थरांची हंडी फोडली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला सिनेअभिनेत्री श्रद्धा कपूरसह हजारो गोविंदा उपस्थित होते.

टेंभी नाका येथे दहीहंडी पथकातील गोविंदांना संबोधित करताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला दहीहंडी उत्सव आता संपूर्ण महाराष्ट्रभर फोफावला आहे. मुंबईतला प्रत्येक गोविंदा टेंभी नाक्याला सलामी देऊन पुढे जातो. हा आपला इतिहास आणि परंपरा आहे. ही परंपरा वाढवण्याचं आणि जोपासण्याचं काम आपलं आहे. ठाण्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, असं आनंद दिघे यांचं स्वप्न होतं. त्यांच्या पुण्याईमुळे आणि आशीर्वादामुळे मला मुख्यमंत्री म्हणून या दहीहंडीला उपस्थित राहता आलं, हे मी माझं भाग्य समजतो.”

“दीड महिन्यापूर्वी आम्हीदेखील सर्वात मोठी हंडी फोडली आहे. ती हंडी फोडणं तसं कठीण काम होतं आणि ती खूप उंचही होती. पण आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे, बाळासाहेब आणि दिघेसाहेबांच्या आशीर्वादामुळे आम्ही ती हंडी फोडू शकलो. आम्ही ५० थर लावले होते. हे थर आणखी वाढत जातील, याची काळजी करायचं काहीही कारण नाही” असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

हेही वाचा- राज्यात ‘प्रो-गोविंदा’ स्पर्धा; खेळाडूंना बक्षिसासह मिळणार शासकीय नोकरी, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, त्यांनी गोविंदासाठी जाहीर केलेल्या विविध घोषणांची माहिती दिली. तसेच मागील अडीच वर्षांपासून राज्यात कोविड निर्बंधामुळे दहीहंडी उत्सव साजरा करता आला नाही. पण यावेळी कोणतेही निर्बंध लावले नाहीत. गणपती उत्सवदेखील अशाच जल्लोषात साजरा करायचा आहे, सर्व निर्बंध हटवण्यात आले आहेत. पण कोविडचं संकट अद्याप गेलं नाही. कोणत्याही प्रकारची लक्षणं आढळली तर त्वरित तपासणी करा, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.