रत्नागिरी- स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या मोजक्या मराठी साप्ताहिकांपैकी रत्नागिरीतून प्रकाशित होणारे ‘सत्यशोधक’ या साप्ताहिकाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या विशेषांकाचे ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या हस्ते  समारंभपूर्वक प्रकाशन करण्यात आले.

‘सत्यशोधक’ची दीडशे वर्षांची वैभवशाली परंपरा जपण्याचे काम नव्या पिढीने केले आहे. असत्याला सत्य मानून खोट्याचे खरे करण्याचा आजच्या काळात सत्यशोधक साप्ताहिकाने एक नवा आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन कांबळे यांनी यावेळी बोलताना केले.

ते म्हणाले की, महात्मा फुलेंचा सत्यधर्म केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशपातळीवर नेण्याचे काम कोकणातील जनतेने केले आहे. नव्या युगात वृत्तपत्र चालविणे खूप कठीण बाब आहे. वाचकांचे पाठबळ यासाठी खूप महत्त्वाचे असते. सत्यशोधक साप्ताहिकाने हा विशेषांक प्रकाशित करून नव्या पिढीसाठी एक संदर्भग्रंथ उपलब्ध करून दिला आहे.

माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ. गणेश मुळ्ये, साप्ताहिक सत्यशोधक चे संपादक नितीन लिमये, सत्यशोधक विशेषांकाचे अतिथी संपादक धीरज वाटेकर आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.

 कै. हरी नारायण लिमये यांनी इ. स. १८७१ मध्ये या साप्ताहिकाचा शुभारंभ केला. सुरुवातीला ‘सामथ्र्य आहे चळवळीचे…’ हे ब्रीदवाक्य असलेल्या या साप्ताहिकाने काळानुसार बदलत स्वातंत्र्यानंतर ‘कॉंग्रेसप्रणीत समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार करणारे साप्ताहिक,’ असे ब्रीदवाक्य केले आणि त्यानुसार पुढील वाटचाल करत राहिले. १९३५ ते १९६० या काळात तर ते आठवड्यातून दोन वेळा प्रकाशित होत असे. स्वातंत्र्यवीर सावरकर  यांची १६ मे १९३७ रोजी ब्रिटिश सरकारने मुक्तता केली. त्या दिवशी दुपारी बातमी कळल्यानंतर अवघ्या २० मिनिटांत ‘सत्यशोधक’ने खास आवृत्तीद्वारे  ही सुखद वार्ता रत्नागिरीकरांना सांगितली. त्याचप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा २४ पानी विशेषांक प्रसिद्ध करण्यात आला होता. त्या काळात ‘सत्यशोधक’चा खप १२-१५ हजारांवर पोचला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुमारे साडेचारशे पानांच्या या अंकामध्ये कोकण आणि पत्रकारिता, या दोन्ही क्षेत्रांमध्ये या प्रदीर्घ कालखंडात झालेल्या बदलांचा चिकित्सक धांडोळा घेतला आहे. पर्यटन (प्र. के. घाणेकर, प्रभाकर सावे), विकास (प्रमोद कोनकर, मधू मंगेश कर्णिक), इतिहास (कै. भालचंद्र दिवाकर, अण्णा शिरगावकर), साहित्य-नाट्य (प्रा. सुरेश जोशी, अनिल दांडेकर), शिक्षण (रेणू दांडेकर), पाणी (डॉ. श्रीरंग कद्रेकर, विजय जोगळेकर), बंदरे (मरिनर दिलीप भाटकर) इत्यादी विविध क्षेत्रांवर तज्ज्ञांनी मांडणी केली आहे, तर सर्वश्री अर्रंवद गोखले, भानू काळे, उत्तम कांबळे इत्यादींनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर भाष्य करत भविष्याचाही वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे.  या अंकाचे देणगी मूल्य ७९९ रुपये असून सध्या ५०० रुपये या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. अंकाच्या मागणीसाठी नितीन लिमये  (९४२३२९१३१९ / ९५४५०३०४५४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.