Abhijeet Deshmukh Reaction Kalyan Scuffle : कल्याणच्या योगीधाम सोसायटीत एका अमराठी व्यक्तीने मराठी व्यक्तीला मारहाण केल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. हे प्रकरण थेट विधानसभेत पोहोचलं आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ज्या व्यक्तीला मारहाण झाली त्या व्यक्तीची आता प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी रुग्णालयातूनच त्यांची कैफियत मांडली आहे.

“शुक्ला नावाचा इसम ४०१ मध्ये राहतो. ४०३ मध्ये कवळीकट्टे कुटुंबीय राहतात. गुरुवारी रात्री त्यांच्यात शा‍ब्दिक चकमक झाली. त्यानंतर मराठीवरून त्याने वाद घातला. तेव्हा मी मध्ये पडलो आणि म्हणालो की तुमच्या दोघांतील वाद तुम्ही दोघं सोडवा, त्यात मराठीचा विषय आणू का. पण तो उद्दामपणे बोलायला लागला. मी मंत्रालयात आहे, ठरवलं तर १० तासांत अख्खी इमारत रिकामी करू शकतो, असं तो म्हणून लागला. त्याची एवढी मुजोरी सुरू होती. मी पुन्हा घरात गेलो. पण अर्ध्या तासाने मला आवाज आला त्यामुळे मी बाहेर आलो. तर त्याने १५-१६ पोरं मागवली होती. कवळीकट्टे कुटुंबातील दोघांना ही मुलं मारत होती. त्यामुळे मी मध्ये गेलो. त्याने माझ्यावर धारदार शस्त्राने वार केला”, असं जखमी असलेले अभिजीत देशमुख म्हणाले.

हेही वाचा >> Kalyan Dispute: कल्याण मारहाण प्रकरणी अखेर अखिलेश शुक्लांनी दिलं स्पष्टीकरण; देशमुख कुटुंबानंच पत्नीला शिवीगाळ केल्याचा आरोप!

ते पुढे म्हणाले, “त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याची नोकरी गेली पाहिजे. पोलीस ठाण्यातही लांडगे नावाच्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला व्हिआयपी ट्रीटमेंट दिली. आम्हाला पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात बसवून घेतलं पण गुन्हा दाखल करून घेतला नाही.”

शुक्लाकडे पिस्तुल होती

तसंच, “त्या शुक्लाकडे पिस्तुल होतं. त्याची बायको म्हणत होती की मारो, मारो किसीको मत छोडो. शुक्ला म्हणतो की मी आयएएस आहे, माझं कोणी वाकडं करू शकत नाही”, असंही देशमुख यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

l