महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँक घोटाळ्याप्रकरणी ‘सक्तवसुली संचलनालया’ने (ईडी) राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत ७० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बँकेच्या संचालकांसह राज्यातील बड्या नेत्यांसाठी हा झटका मानला जात आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीतही यामुळे वाढ होणार आहे. मात्र असे असतानाच या संपूर्ण प्रकरणाशी शरद पवार यांचा थेट काय संबंध आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. खुद्द शरद पवार, अजित पवार यांच्याबरोबरच हे प्रकरण उघडकीस आणणारे भाजपाचे नेते एकनाथ खडसे यांनी या प्रकरणात शरद पवारांचे नाव आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. जाणून घेऊयात कोण काय म्हणाले आहे यासंदर्भात

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी काय गुन्हा केला समजून घेतलं पाहिजे: शरद पवार 

‘मी नक्की गुन्हा काय केला ते मला समजून घेतलं पाहिजे’ असं शरद पवार यांनी या प्रकरणासंदर्भात मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटलं आहे. ईडी गुन्हा दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर पवार यांनी मंगळवारी यासंदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया नोंदवताना या प्रकरणाशी आणि बँकेशी आपला काहीच संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे. ‘माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर मी या निर्णयाचे स्वागत करतो. मी कधीही कोणत्याच बँकेचा संचालक नव्हतो. ईडीने माझ्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती नाही,’ असं पवारांनी म्हटलं होतं. तर निवडणूक तोंडावर असताना माझ्यासारख्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करणं याचा परिणाम कसा होईल हे सांगायची गरज नाही असा सूचक इशाराही पावरांनी दिला होता.

प्रकरणाशी देणं घेणं नसणाऱ्यांवर गुन्हे कसे: एकनाथ खडसे</strong>

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही महाराष्ट्र शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणात पवारांचे नाव समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं आहे. शरद पवार यांचे नाव जबरदस्ती प्रकरणात गोवून गुन्हा दाखल करणे म्हणजे समजायला मार्ग नाही. ज्यांचे प्रकरणाशी काही देणे घेणे नाही त्यांच्या नावाने ईडी कसे काय गुन्हा दाखल करते असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला आहे.

बँकेच्या कोणत्याही पदावर शरद पवार नव्हते: अजित पवार</strong>

शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांवरही ईडीने गुन्हा दाखल केल्याबद्दल अजित पवार यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. ‘शिखर बँकेच्या कोणत्याही पदावर शरद पवार नव्हते. त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माध्यमातून वृत्त आल्यानंतरच शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. मला कोणावरही आरोप करायचा नाही. यंत्रणांना तपास करण्याचा अधिकार आहे. त्यांनी खुशाल चौकशी करावी. पण ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना म्हणणं मांडायला वेळ द्यायला हवा ना?’ असं अजित पवार म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the connection of sharad pawar with maharashtra state cooperative bank case scsg
First published on: 25-09-2019 at 16:13 IST