“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दर्शवत आहे”, असं म्हणत राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक नसणार असल्याचं पाडवा मेळाव्यातून जाहीर केलं. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. तसंच, समाज माध्यमांवरही त्यांना ट्रोल केलं गेलं. राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, याबाबत आज त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण केलं आहे. पदाधिकारी आणि नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्याबाबत गुढीपाडवा मेळाव्यात घोषणा केली होती. तसेच त्या भूमिकेचे विश्लेषणही मी केले होते. भूमिका बदलली असा माझ्यावर आरोप होत आहे. पण २०१४ च्या अगोदरची भूमिका निवडून आल्यानंतर जर बदलू शकते, तर मलाही भूमिका बदलणे आवश्यक असते. मी भूमिका बदलली नव्हती तर धोरणांवर टीका केली होती. अर्थात टीका करताना मी त्यामोबदल्यात काही मागितले नव्हते. मला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून मी टीका करतोय किंवा माझे ४० आमदार फोडले म्हणून मी टीका केली नव्हती. मुद्द्यांवर टीका होती. त्या भूमिकांवर केलेली टीका होती. त्यानंतरच्या पाच वर्षात ज्या चांगल्या गोष्टी झाल्या त्याचं स्वागत केलं”, असं राज ठाकरेंनी आज स्पष्ट केलं.

तसंच, नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची पुन्हा एकदा संधी देण्यासाठी पाठिंबा द्यावा या विचाराने मी महायुतील बिनशर्त पाठिंबा दर्शवला, असंही राज ठाकरे म्हणाले.

मोदींनी आता सर्व राज्यांना एकसमान दृष्टीने पाहावीत

“हा पाठिंबा देताना महाराष्ट्रातील अनेक प्रश्नांबाबत चर्चा झाली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यापासून, गडकिल्ल्याचं संवर्धन, तरुणांचा विषय आहे. या सर्वांत औद्योगिकदृष्ट्या महाराष्ट्र फार पुढारलेला आहे. उद्योगपतीत पहिलं प्राधान्य असं वाटणारं महाराष्ट्र राज्य पहिलं आहे. नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्य समान दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. गुजरात त्यांना प्रिय असणं स्वाभाविक आहे, पण त्यांची पुढची पावलं पाहणं आवश्यक आहे. या सगळ्या प्रकरणी त्यांना पाठिंबा दिल्याप्रकरणी नेते, पदाधिकाऱ्यांची चर्चा केली”, असं राज ठाकरे म्हणाले.

महायुतीचा प्रचार मनसे करणार

“भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीतील लोकांनी कोणाशी संपर्क साधायचा याची यादी तयार होईल आणि त्यांच्यापर्यंत जाईल. आमच्याही पदाधिकारी, मनसैनिकांना योग्य मानाने वागवतील, अशी अपेक्षा आहे. पूर्णपणे सहकार्य करायचं आणि प्रचार करण्यासाठी सांगितलं आहे”, असंही राज ठाकरे म्हणाले.