मराठा समाजाने आरक्षणासाठी एल्गार पुकारल्यानंतर ओबीसी समाजानेही राज्यभर आंदोलन केले. ओबीसीच्या राखीव जागेतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध दर्शवला होता. त्यानिमित्ताने मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यातील शाब्दिक युद्ध अवघ्या राज्याने पाहिले. दरम्यान, मराठा समाजाला आता सरकारने ओबीसी कोट्यातूनच आरक्षण जाहीर केलं आहे. यावरून ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे. छगन भुजबळ ज्या सरकारमध्ये आहेत, त्याच सरकारने मराठ्यांना आरक्षण लागू केल्याने छगन भुजबळ आता पुढची भूमिका काय घेतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. तसंच, ओबीसी समाजाची पुढची दिशा काय यावरही चर्चा सुरू आहे. त्यामुळे, छगन भुजबळांनी उद्या सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे.

“ओबीसींवर अन्याय केला जातोय की मराठ्यांना फसवलं जातंय याचा अभ्यास करावा लागेल. सरसकट सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी केली जातेय. पण ज्यांनी घरे-दारे जाळली त्यांच्यावरील गुन्हे मागे घेणार का?” असा सवाल छगन भुजबळांनी विचारला.

हेही वाचा >> “मराठा समाजासाठी अध्यादेश काढलाच नाही, तो केवळ…”, छगन भुजबळांनी ठेवलं मुद्द्यावर बोट!

“सरकारी भरती करायची नाही. त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवायच्या, असं जरांगे म्हणाले. पण किती जागा ठेवायच्या? पुनर्विचार याचिका न्यायालयात आहे तोपर्यंत मराठा समाजातील सर्वांना १०० टक्के शिक्षण मोफत करण्याची मागणी जरांगेंनी केली. पण मराठाच का? ओबीसी, दलित, आदिवासी, ओपन या सर्वांनाच द्या मोफत आरक्षण द्या. ब्राम्हण समाजालाही द्या”, अशी उपरोधिक मागणीही त्यांनी केली.

हेही वाचा >> “लाखोंच्या संख्येने…”, मराठा समाजाला आरक्षण जाहीर होताच छगन भुजबळांचं ओबीसी समाजाला आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी उद्या पाच वाजता बी ६, सिद्धगड येथे माझ्या सरकारी निवासस्थानी बैठक घेणार आहे. या बैठकीत ओबीसी, दलित, आदिवासी समाजातील नेत्यांनी यावं. कोणत्याही पक्षाचे आणि कोणत्याही संघटनांनी या बैठकीत सहभागी व्हावं. आपल्या पक्ष आणि संघटनेचा अभिनिवेश सोडून या कामासाठी सिद्धगड बंगल्यावर यावं. आपण चर्चा करूया. या बैठकीत कोणत्याही पक्षाला कमी लेखण्याचा किंवा जास्त लेखण्याचा प्रयत्न होणार नाही. केवळ ओबीसी आणि ओबीसी या विषयावरच चर्चा होणार आहे. आरक्षणप्रश्नी पुढे काय पावलं उचलायची यासंदर्भात निर्णय घेण्याकरता ही बैठक असेल”, असं छगन भुजबळ म्हणाले.