आईने केलेले संस्कार हीच माझी पुंजी आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ‘लोकसत्ता सहज बोलता बोलता’ या वेबसंवादात नितीन गडकरी सहभागी झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. नितीन गडकरी यांच्या आई या सामाजिक कार्यकर्त्या होत्या. जनसंघाचं कामही त्यांनी मोठ्या प्रमाणावर केलं होतं असंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“माझा जन्म झाला तेव्हा घरातली परिस्थिती बिकट होती. मात्र आईने आम्हाला घडवलं. एकदा मी मित्रांसोबत घरी आलो. मित्र बाहेर होते मी घरी येऊन लाडू खाल्ला. मात्र मी एकट्याने लाडू खाल्ला त्यावेळी मला आई ओरडली. तू एकट्यानेच लाडू का खाल्ला? असं वागणं बरोबर नाही. मग मी त्यालाही लाडू दिला. हा जो संस्कार आहे तो आजही तसाच राहिला आहे. माझ्यासोबतचे सहकारी हे जेवले आहेत ना? याची खात्री मी जेवण्याआधी करुन घेतो. दिल्लीतल्या माझ्या घरी तर एकावेळी २४ जण जेवतील एवढं मोठं डायनिंग टेबल आहे. तिथेही लोक हक्काने येतात. आईच्या वेळी जे वातावरण घरात होतं तेच आताही आमच्या घरात आहे” असंही गडकरी म्हणाले.

“माझी आई जनसंघाचं काम करत होती. सुमतीबाई सुकळीकर म्हणून जनसंघाच्या खूप मोठ्या नेत्या होत्या. आईचं मराठी उत्कृष्ट होतं. मी जेव्हा पाच-सहा वर्षांचा होतो तेव्हा आईने मॅट्रीकची परीक्षा दिली. समाजकार्यासाठी तिने वाहून घेतलं होतं. तिच्या विचारांचा प्रभाव आमच्या सगळ्यांवर पडला. त्या काळी आमचा भाग संघाला अनुकूल नव्हता. संघाला विरोध करणारा वर्ग बराच मोठा होता. त्यावेळी लोक हेटाळणी करायचे, उपहास व्हायचा, अपमान व्हायचा. जेवढे विरोधात होते, ते सगळे नंतर भाजपात आले. ज्या भागात विरोध झाला, त्या भागातली परिस्थिती बदलली. आता भाजपाचा उमेदवार ५० हजार मतांनी विधानसभेत निवडून येतो.” असंही गडकरी यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatever i am today is because of my mother says nitin gadkari scj
First published on: 15-05-2020 at 20:24 IST