बॉलिवूडचा अभिनेता गोविंदा आज शिवसेना एकनाथ शिंदे गटात सामील झाला. २००४ साली मुंबईच्या उत्तर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव करून गोविंदा लोकसभेत पोहोचला. मात्र पाचच वर्षात त्याने राजकारणातून माघार घेतली. “मी राजकारणात येऊन मोठी चूक केली, राजकारण माझा प्रांत नाही”, असे विधान गोविंदानं २०१२ साली केलं होतं. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर काही वर्षांनी त्याचे हे विधान समोर आले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मी १४ वर्षांच्या वनवासानंतर राजकारणात परत येतोय, असेही गोविंदाने सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदाला यावेळी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी दिली जाऊ शकते. गोविंदासाठी हा मतदारसंघ तसा परका नाही. २००४ साली याच्या बाजूच्याच उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून गोविंदाने निवडणूक लढवत विजय मिळविला होता. २००४ साली माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते राम नाईक यांचा पराभव करून गोविंदाने मोठा विजय प्राप्त केला होता.

“चालणारा तरी नट घ्यायचा”, जयंत पाटलांच्या गोविंदावरील टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर

मात्र, २००९ च्या लोकसभा निवडणुकीतून गोविंदाचे तिकीट कापण्यात आलं. पक्षातील काही लोकांनी त्यांच्या विरोधात कारस्थान केल्याचा आरोप गोविदानं केला होता. इंडिया टुडेने गोविंदाच्या जुन्या विधानाबद्दल एक वृत्त प्रसारित केलं आहे. गोविदानं तेव्हा म्हटलं होतं, “केंद्रीय नेतृत्व मला उत्तर मुंबईच्या जागेवरून पुन्हा निवडणूक लढविण्यास सांगणार होतं. मात्र राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी हा निरोप माझ्यापर्यंत पोहचू दिला नाही. मी माझ्याच पक्षात एकटा पडलो होतो, काही लोकांना माझ्यासमवेत काम करायचे नव्हते.” शेवटी गोविंदा काँग्रेसमधून बाहेर पडला. तर दुसरीकडे खासदार असताना गोविंदाचा संपर्क होत नव्हता, असा आरोप काँग्रेसमधील काही नेत्यांनी केला होता.

आता पुन्हा राजकारणात येणार नाही

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर गोविदानं २०१२ रोजी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना राजकारणावर भाष्य केलं. राजकारण माझा प्रांत नाही. आमच्या कुटुंबात कुणीही राजकारणात नव्हतं. राजकारण माझ्या रक्तात नाही. त्यामुळं मी आता पुन्हा राजकारणात परतणार नाही, असे गोविंदा त्यावेळी म्हणाला होता. तसेच राजकारणात येणं ही माझी सर्वात मोठी चूक होती, असेही तो म्हणाला. राजकारणात आल्यानंतर माझे बॉलिवूडमधील करियर पणाला लागले. २००९ नंतर पुन्हा रुळावर येण्यासाठी मला प्रचंड कष्ट घ्यावे लागले, असेही तो म्हणाला.

हे ही वाचा >> भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत

राजकारणामुळं वजन प्रचंड वाढलं

जर मला भूतकाळाता जाऊन काही निर्णय बदलण्याची मुभा मिळाली, तर मी सर्वात आधी राजकारणात येण्याचा निर्णय बदलेल, असेही गोविदांने म्हटले होते. तसेच राजकारणात आल्यानंतर माझे वजन कमालीचे वाढले, अशीही एक खंत त्याने बोलून दाखविली होती. त्यावेळी गोविंदाचे वजन १०० किलोच्या घरात पोहोचल्याचे बोलले जाते. यावर बोलताना गोविंदा म्हणाला, “सिनेसृष्टीत परतण्यासाठी मला वजन कमी करण्यावर खूप काम करावे लागले. पण तरीही मी प्रयत्न सोडले नाहीत. पण राजकारणात मी जितकी वर्ष वाया घालवली, ती आता पुन्हा येणार नाहीत.”