औरंगाबादहून ३०० किलोमीटरवर असणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींसमवेत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आवर्जून उपस्थिती लावली. मात्र, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमवेत दुष्काळी दौऱ्यात ग्रामीण भागात मात्र ते दिसले नाहीत. लातूरमधील त्यांची उपस्थिती आणि जिल्ह्य़ातील दौऱ्यांमध्ये त्यांचे न दिसणे हा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. या विषयी दर्डा यांना विचारले असता ते म्हणाले, राहुल गांधी यांच्या दौऱ्यात त्यांच्या स्वागतासाठी आणि निरोप देताना विमानतळावर आवर्जून उपस्थित होतो. स्वागताला आणि निरोपाला असणारे मंत्रीमहोदय दुष्काळी दौऱ्यात का नव्हते, याची चर्चा सुरू असून त्याला कोळसा घोटाळय़ाचे संदर्भ जोडले जात आहेत.
फुलंब्री तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम, पालकमंत्री बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती. जिल्ह्य़ात नेत्याचा दौरा असेल तर त्या जिल्ह्य़ातील मंत्री सर्व कार्यक्रमात सहभागी होतात. मात्र, स्वागत आणि निरोपाच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त राजेंद्र दर्डा दुष्काळी दौऱ्यात नव्हते. दुसरीकडे लातूर येथे दयानंद शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात ते व्यासपीठावर होते. या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शिष्टाचार म्हणून उपस्थित राहणे आवश्यक होते. त्यांचे पत्रिकेवर नावही होते. मात्र, लातूरच्या कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली नाही. महत्त्वाच्या दोन कार्यक्रमांमधून मंत्र्यांची उपस्थितीच्या अनुषंगाने चर्चा सुरू आहे.
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्यात कोणी कोणत्या कार्यक्रमात सहभागी व्हावे, हे दिल्ली येथूनच ठरले होते. त्याचे निकषही असतात. त्याप्रमाणे कार्यक्रम झाल्याचे एका वरिष्ठ सूत्राने ‘लोकसत्ता’ला सांगितले.

राहुल गांधी यांचे विमानतळावर स्वागत करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. लातूरच्या कार्यक्रमातही बोलावले होते. तेथे उपस्थित राहण्याचा आनंदच वाटला.
– राजेंद्र दर्डा, शालेय शिक्षणमंत्री