मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यावरून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. तसंच, कुणबी नोंदी शोधण्यासाठी नेमलेली समिती बरखास्त करण्याचीही मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांच्या या भूमिकेमुळे राज्य सरकारमधून मराठा आरक्षणाबाबत दोन मतप्रवाह तयार झाले आहेत. परिणामी छगन भुजबळांना त्यांच्याच पक्षातील हसन मुश्रीफ यांनी घरचा आहेर दिला आहे.

हसन मुश्रीफ म्हणाले की, भुजबळांनी पहिल्यापासून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. जे कुणबी दाखले देत आहेत त्याबाबत त्यांचं मत वेगळं आहे. कुणबी दाखले पद्धतशीर दिले आणि कायदेशीर असतील तर त्याला ओबीसीचा दाखला द्यावाच लागेल.

हेही वाचा >> “धर्मवीरच्या पहिल्या भागात काही गोष्टी इच्छेविरुद्ध केल्या, पण आता नाही”; मुख्यमंत्र्यांचा रोख कोणाकडे?

“कुणबी दाखले योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? असं म्हणत हसन मुश्रीफांनी छगन भुजबळांवर टीका केली. ते म्हणाले की, कुणबी दाखले योग्य की अयोग्य ठरवण्याचा अधिकार एखाद्या समितीला असतो. जातपडताळणी समितीलाच तो अधिकार आहे. मोठ्या प्रमाणात कुणबी दाखले मिळत आहेत म्हणून भुजबळांची तक्रार असेल तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं पाहिजे. त्यानंतरच, त्यांनी असे विधान केले पाहिजे. कारण हा निर्णय मंत्रिमंडळाचा सामूहिक होता. त्यामुळे या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा झाली पाहिजे”, असंही हसन मुश्रीफ म्हणाले.