Who is IPS Officer Anjana Krishna: सोलापूर जिल्ह्यातील एका गावात सुरू असलेल्या मुरूम उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी एक तरूण महिला आयपीएस अधिकारी पोहोचतात, त्यानंतर तेथील शेतकरी कारवाई रोखण्यासाठी थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन फिरवतात. कार्यकर्त्याच्या फोनवरून अजित पवार आयपीएस अधिकाऱ्याला कारवाई रोखण्याचे तोंडी आदेश देतात… मात्र तरूण महिला आयपीएस अधिकारी दुसऱ्याच्या नाही तर माझ्या फोनवर संपर्क करायला हवा होता, असे सांगतात. चित्रपटात शोभावा असा प्रसंग सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात घडला आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत असून विरोधकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. थेट अजित पवारांना भिडणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा कोण आहेत? जाणून घेऊ.

प्रकरण काय आहे?

तहसीलदारांच्या आदेशानंतर उत्खनन रोखण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी करमाळा तालुक्यातील गावात कारवाई सुरू केली होती. सदर कारवाई रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी अजित पवारांना फोन लावला. यावेळी फोनवर बोलत असताना आयपीएस अंजना कृष्णा यांनी मला दुसऱ्यांच्या फोनवर नाही तर माझ्या फोनवर संपर्क साधायला हवा होता, असे थेट अजित पवारांना सांगितले. यानंतर संतापलेल्या अजित पवारांनी अंजना कृष्णा यांचा मोबाइल नंबर मागितला आणि त्यांना व्हिडीओ कॉल केला.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून अजित पवार तरूण महिला आयपीएस अधिकाऱ्याला झापत असल्याचे ऐकू येत आहे. थेट उपमुख्यमंत्र्याला न ओळखण्याची तुमची हिंमत कशी झाली? असेही अजित पवार सुनावताना दिसतात. त्यानंतर व्हिडीओ कॉलवर त्यांनी कारवाई थांबविण्याचे आदेश अंजना कृष्णा यांना दिले.

अंजना कृष्णा कोण आहेत?

अंजना कृष्णा २०२३ बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून त्यांची सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात पोलीस उपअधीक्षक पदी नियुक्ती झाली आहे. अंजना कृष्णा मुळच्या केरळ राज्यातील तिरुवनंतपुरम येथील आहेत. अंजना कृष्णा यांचे वडील बिजू हे कपड्यांचे छोटेसे दुकान चालवतात. तर त्यांची आई सीमा या न्यायालयात टायपिस्ट आहेत.

केरळमध्ये प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अंजना कृष्णा यांनी यूपीएससीची परीक्षा दिली. २०२२ साली त्यांनी भारतातून ३५५ वा क्रमांक पटकावला होता.

आता कुठे गेली तुमची शिस्त

“अजित पवारांवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. अजित पवार आता एका आयपीएस अधिकाऱ्याला धमकावत आहेत. ते नेहमी म्हणतात ना, मी बेशिस्त खपवून घेणार नाही. मग आता त्यांनी काय केले? तुमच्या पक्षातल्या चोरांना संरक्षण देण्यासाठी तुम्ही एका आयपीएस अधिकाऱ्याला अशाप्रकारे दम देता. मग आता कुठे गेली तुमची शिस्त?”, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) आरोप फेटाळले

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार) हे आरोप फेटाळले आहेत. आयपीएस अधिकाऱ्याला अजित पवारांनी झापल्याचा दावा पक्षाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी फेटाळून लावला. काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या कुर्डू गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांच्या कारवाईविरोधात एकवटले होते. त्यावेळी प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा तिथे होत्या. प्रशिक्षणार्थी अधिकारी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना तुम्ही कोण? असे विचारत असेल तर हेदेखील चुकीचे आहे, असे आनंद परांजपे म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की, अजित पवारांचा आवाजच तसा आहे. त्यांनी आयपीएस अधिकाऱ्याला झापलेले नाही.