केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज(रविवार) बुलडाणा येथे माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देताना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधल्याचं दिसून आले.

समीर वानखेडेंबाबत नवाब मलिकांनी रान उठलं आहे असं सांगत, माध्यमांनी नारायण राणेंची यावर प्रतिक्रिया विचारली असता, यावर बोलतना केंद्रीयमंत्री नारायण राणे म्हणाले, “नवाब मलिक कोण आहे? त्यांचे जावई कोण आहे? त्यांनी आपली पार्श्वभूमीव पाहावी आणि मग दुसऱ्यांवर बोलावं.”

दि. चिखली अर्बन को ऑप बँक लि. चिखलीच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त नि:शुल्क उद्योजकता प्रोत्साहन व प्रशिक्षण शिबिरास केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

समीर वानखेडे यांच्या पाठीशी केंद्र सरकार आहे का? या प्रश्नावर उत्तर देतांना राणे म्हणाले, “मी आता जाईन आणि मोदी साहेबांना विचारेन की आपण पाठीमागे आहोत का?” तसेच, नवाब मलिक यांनी फडणवीस यांच्यावर आरोप केलेत की चेंबूर येथील एक व्यक्ती फडणवीस यांच्या जवळचा आहे आणि ईडीच्या सतत संपर्कात समीर वानखेडे असतात, असं माध्यम प्रतिनिधींनी सांगितल्यावर यावर उत्तर देतांना राणे म्हणाले की, “मग काय त्यात काय आलं? कोण कोणाचा मित्र आहे, माझाही आहे तो, मित्र नाही तर तो आमचा कार्यकर्ता आहे. मी चेंबूरचा आहे, मुळात माझं लहानपण, आयुष्य  चेंबूरमध्ये गेलं आणि तो काही दहशतवादी नाहीए आणि तो संपर्कात असतो ईडीच्या ओळख आहे, चांगली माहिती देतो दोन नंबरच्या लोकांची. पैसे लपून ठेवतात ना त्या लोकांची. भुजबळांना अटक का झाली, पंढरपूरला तीर्थ यात्रेला गेले म्हणून झाली का? ते आता फार बोलताय.”

ईडीच्या संपर्कात समीर वानखेडे नेहमीच असतात असा नवाब मलिक यांचा आरोप आहे आणि ते अधिवेशनात ते याबाबत संपूर्ण खुलासा करणार आहेत, असं माध्यम प्रतिनिधींनी राणेंना सांगून यावर प्रतिक्रिया विचारली असता राणे म्हणाले, “अधिवेशन म्हणजे काय? कोणाचं अधिवेशन? आमचे आहेत ना १०५, भाजपाचे १०५ आहेत आणि तिकडे काय असं फासावर द्यायचा विधिमंडळाला अधिकार नाही. समीर वानखेडेने काय केलं? जे चुकीचं करताय त्यांच्या मागे लागलेत ना? ज्याने भ्रष्टाचार केला… एका-एका मंत्र्याकडून चौकशीमध्ये २४ हजार कोटी निघत आहेत. मीडियाने कोणाची बाजू घ्यावी? भ्रष्टाचार करणाऱ्यांची की भ्रष्टाचार उकरून काढणाऱ्यांची? सांगा ना मला. ज्या ज्या मंत्र्याचे पाच हजार कोटी, सहा हजार कोटी… कुठून आणले हे व्यवसायामधून आणले का? भ्रष्टाचार केला, लोकांचं शोषणचं केलं ना? मग लागू द्या मागे. तिथे आमचे देवेंद्र फडणवीस आहेत. ”

बुलडाण्यामध्ये मागील आठवड्यातील मोर्चामध्ये भाजपच्या नेत्याने शिवसेनेला हिजड्यांची फौज अशी टीका केली होती. त्यावर नारायण राणे यांना विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना राणे म्हणाले की, “मी त्या शब्दांच समर्थन करणार नाही पण ते अनेक सैनिकांचं मत आहे. त्यामुळे आता सगळेजण येणाऱ्या दोन वर्षात भारतीय जनता पक्षाकडे येतील आणि सगळ्यांना तपासून भाजपामध्ये प्रवेश देऊ.” तसेच ते पुढे बोलतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले की, एक आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची गुणवत्ता त्यांच्यात नाही. तसेच, राज्यातील सरकार किती दिवस टिकेल? या प्रश्नावर राणेंनी साडेसात असं एका शब्दात उत्तर दिलं.