लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नितीन गडकरी यांनी आज मोहाडी येथे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्यासाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या राजकीय वारस कोण असणार, याची माहिती दिली.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दिल्लीत चांगलाच दबदबा आहे. रस्ते विकास आणि वाहतूक मंत्रायलयातअंतर्गत त्यांनी अनेक प्रयोग अंमलात आणले. त्यामुळे नितीन गडकरी यांचा राजकीय वारसा कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान, याबाबत त्यांनी आजच्या सभेत जाहीरपणे सांगितलं.

हेही वाचा >> “मुनगंटीवार निवडून आले तर असा पॉवरफुल शिलाजीत देऊ की…”, नितीन गडकरींचं मिश्किल विधान; म्हणाले, “मैं जो बोलता हूं…”

नितीन गडकरी म्हणाले, “आपल्याला शेतकऱ्यांना कर्जमुक्त करणारा नेता पाहिजे. तरुण मुलांच्या हाताला काम देणारा नेता पाहिजे. कोण तेली आहे, माळी, बौद्ध आहे. हे फक्त निवडणुकीपुरतं राहतं. कोणी जातवाल्याने आपल्या जातवाल्याला मोठं केलं नाही.

नितीन गडकरी यांचा राजकीय वारसदार कोण?

ते पुढे म्हणाले, “माझा मुलगा, बायको, मुलगी राजकारणात नाही. ते आयुष्यात तिकिट मागणार नाहीत. मी माझ्या पोरांना सांगितलं की माझी संपत्ती तुमची. पण राजकीय वारसा फक्त भाजपाच्या कार्यकर्त्याला मिळेल. मी माझा राजकीय वारसा त्या कार्यकर्त्याला देईन, तुम्हाला नाही देणार.”

“जर जनतेने मागणी केली तर तुम्ही जरूर निवडणुकीत उभे राहा. पण मायबापाने मागणी करणं चांगलं नाही. विकासाची दृष्टी स्वीकारावी लागेल”, असंही ते म्हणाले.

नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ करणार

नागपूरला आंतरराष्ट्रीय विमानतळ होईल. पण तुम्ही म्हणाल की काय सांगून राहिले हे.पण आहे का कोणी माय का लाल. जो सांगू शकेल की मी बोललेलो मी केलं नाही. मी तर म्हणतो रेकॉर्ड करून घ्या माझं भाषण. मी खोटं नाही बोलत. माझा रेकॉर्ड आहे. माझ्याकडून काम होत नसेल तर मी तोंडावर सांगतो की नाही होणार. पण मी खोटं नाही बोलत. मी ९० टक्के समाजकारण करतो आणि १० टक्के समाजकारण करतो. जातीपातीचं राजकारण करत नाही. माणूस हा जातीने मोठा नाही, गुणाने मोठा आहे. जातीयता अस्पृश्यता नष्ट केली पाहिजे आणि सामाजिक समरसता निर्माण केली पाहिजे, असंही ते म्हणाले.