Why Shivajirao Chothe Left Shivsena UBT : जालन्यातील शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. चोथे हे मागील चार दशकांपासून शिवसेनेत होते. शिवसेना फुटून दोन गट पडल्यानंतरही ते उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच थांबले. ४० वर्षे त्यांनी जालन्यात शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवत ठेवला होता. परंतु, आता त्यांनी शिवसेनेला (उबाठा) जय महाराष्ट्र केला आहे. चोथे हे शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यावर त्यांनी अद्याप भाष्य केलेलं नाही.
छत्रपती संभाजीनगरचे माजी महापौर त्र्यंबक तुपे यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करत मंगळवारी (२६ ऑगस्ट) मुंबईत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरच्या शेजारी असलेल्या जालना जिल्ह्यातील अंबड मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विद्यमान सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काही तासांच्या अंतराने उद्धव ठाकरे यांना दोन धक्के बसले आहेत.
कोण आहेत शिवाजीराव चोथे?
शिवाजीराव चोथे हे ४० वर्षांपासून शिवसेनेत होते. ते जालन्याचे शिवसेनेचे पहिले जिल्हाप्रमुख होते. सलग २५ वर्षे ते या पदावर होते. १९९५ मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर अंबड विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. ४९,६२८ मतं मिळवत त्यांनी विजय साकारला होता. १९९६ ते २००१, २०१२ ते २०१७ या काळात ते जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहिले आहेत. आता ते पुन्हा एकदा या बँकेचे संचालक झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून ते शिवसेनेचे (उबाठा) जालन्याचे सह-संपर्कप्रमुख होते. यासह ते सध्या जालन्यातील स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागडचे अध्यक्ष आहेत. अंबड नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-चेअरमन आहेत.
शिवाजीराव चोथे १९९५ मध्ये ते अंबड विधानसभा मतदार संघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते. शिवसेनेने १९९९ व २००४ च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांना तिकीट दिलं होतं. मात्र, दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. मागील विधानसभा निवडणूक त्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढवली होती. परंतु, तेव्हा देखील त्यांचा पराभव झाला.