सध्या लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरू असताना दुसरीकडे राज्याला विधानसभा निवडणुकीचेही वेध लागले आहेत. ४ जून रोजी केंद्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर लागलीच विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेच्या निमित्ताने राज्यात नवं समीकरण पाहायला मिळेल की जुनंच सरकार सत्तेवर बसेल, यावर चर्चा रंगल्या आहेत. तसंच, नव्या पर्वाच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला काय असेल याकडे सर्वांचं लक्ष आहे. यावर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. ते लोकसत्ताने आयोजित केलेल्या लोकसंवाद कार्यक्रमात बोलत होते.

“गेल्या वेळी राज्यात भाजपा-शिवसेना युतीने ४१ जागा जिंकल्या होत्या. यंदा महायुती तेवढ्या जागा निश्चित जिंकेल”, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. “भाजपाला केंद्रात पुन्हा सत्ता मिळाल्यावर मित्रपक्षांना वाऱ्यावर सोडले जाईल, अशी उगाचच चर्चा केली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि अन्य मित्रपक्ष महायुती म्हणूनच एकत्रित लढू अशी ग्वाही देतो. भाजपाच्या शत-प्रतिशत नाऱ्याचे काय झाले या प्रश्नावर, जेव्हा केव्हा आम्हाला ५१ टक्के मते मिळण्याची खात्री होईल तेव्हाच आम्ही तसा विचार करू. ही हळूहळू होणारी प्रक्रिया आहे”, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

जागावाटपात लोकसभेची भरपाई विधानसभेच्या वेळी केली जाईल, असे राष्ट्रवादीचे नेते दावा करीत आहेत याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला जागा सोडताना अडचणी येतील, याची त्यांना कल्पना देण्यात आली होती. विधानसभेच्या वेळीही जागावाटपात मित्रपक्षांचा योग्य सन्मान राखला जाईल. मात्र ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील, त्यांचाच मुख्यमंत्री होईल, असे सूत्र असेलच, हे सांगता येणार नाही. आताही भाजपाचे ११५ आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपचे संसदीय मंडळ घेईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >> आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ आग्रहामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले? स्वत: दावा करत म्हणाले, “मी त्यांचे आभारच मानतो!”

“आदित्य ठाकरेंनी १५१ जागांचं उद्दिष्ट जाहीर केलं होतं”

“२०१४ ला शिवसेनेला १४७ जागा देऊन आम्ही १२७ जागा लढण्यास तयार होतो. पण शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी १५१ जागा लढविण्याचे उद्दिष्ट जाहीर केले होते. त्यामुळे शिवसेनेने युती तोडली. त्यातून आम्हाला आमची राज्यातील ताकद समजली. मलाही त्याचा व्यक्तिगत फायदा झाला व मी मुख्यमंत्री होऊ शकलो”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

“शिवसेनेच्या हट्टापायी मला मुख्यमंत्रीपद मिळालं”

“जास्त जागा लढल्याने भाजपाचे अधिक उमेदवार निवडून आले होते. जर शिवसेनेबरोबर आम्ही लढलो असतो, तर भाजपाला कमी जागा मिळाल्याने त्यांच्यापेक्षा आमचे कमी उमेदवार निवडून आले असते आणि मुख्यमंत्री शिवसेनेचाच झाला असता. शिवसेनेच्या हट्टापायी मला मुख्यमंत्रीपद मिळाले. खरे तर मी त्यांचे आभारच मानतो”, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.

हेही वाचा >> पुरेसं संख्याबळ असताना अजित पवारांची गरज का लागली? देवेंद्र फडणवीसांनी केला खुलासा; म्हणाले, “शरद पवारांनी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?

महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार असतील हे तुम्हाला मान्य आहे का? या प्रश्नावर पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात उत्तर दिलं आहे. ते म्हणाले, “महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे ज्या पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असते त्या पक्षाचा होतो. जर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे जास्त आमदार निवडून आले तर त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल. आतापर्यंत आमच्यामध्ये म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर लढत होतोत तेव्हा ज्या पक्षाचे जास्त आमदार असतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत होता. आताही ज्या पक्षाच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असा फार्म्युला असेल. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीआधी आम्ही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवणार नाहीत. त्यानंतर ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल”, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं.